एआय साक्षर होण्यासाठी सज्ज व्हा – राज्यपाल बैस

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात अरुण फिरोदिया, प्रमोद चौधरी, डॉ. राजदान यांना मानद डॉक्टरेट

पिंपरी/ पुणे : “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित आहे. आता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. ‘एआय’ साक्षर होणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहे. मात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. एआयकडे सहानुभूती नसते. माणसाकडे आहे. एआय प्रेम भाव जाणत नाही. माणूस जाणतो. याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतो. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल,” असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केला. नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरूणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. स्वतःला केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन बैस यांनी केले.

डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे श्री बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष श्री अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि क्वालिटी ॲश्युरन्स ॲंड एक्सलन्स सेल, रामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह देशभरातून आलेले विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) सकाळी झालेल्या या सोहळ्यास उपस्थित होते. 

राज्यपाल श्री बैस म्हणाले, “येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. विद्यापीठांना माझा आग्रह असेल की आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन झाले पाहिजे. या व्यवस्थेचा लाभ उठवण्यासाठी रणनिती आखावी लागेल. एआयमुळे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत.”मी आपल्याला सावध करू इच्छितो की एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. चांगली गोष्ट ही आहे की भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात आपल्याला निरंतर शिकत राहावे लागेल. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला ‘स्किल, रिस्किल, अपस्किल’ च्या माध्यमातून तयार व्हावे लागेल, असे प्रतिपादन श्री बैस यांनी केले.

Advertisement

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, “शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी ३.६४ गुण विद्यापीठाला मिळाला असून ए प्लस-प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्कच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार विद्यापीठाच्या दंतवैद्यकशास्त्र महाविद्यालयाला देशात तिसरा क्रमांक मिळाला. वैद्यकीय महाविद्यालयाने देशात एकविसाव्या क्रमांकावरून पंधराव्या स्थानावर झेप घेतली तर विद्यापीठ गटात ४६ वा क्रमांक मिळाला आहे.”

अरुण फिरोदिया म्हणाले, “येथून बाहेर पडल्यानंतर ‘जॉब गिव्हर्स’ व्हा, ‘जॉब टेकर्स’ नको. एक बिलियन डॉलर्स मूल्य असणारे शंभर स्टार्टअप्स देशात सुरू झाले आहेत. भारताची प्रचंड लोकसंख्या ही समस्या नसून वरदान आहे. यातून ‘इकॉनॉमी ऑफ स्केल’ शक्य आहे. तंत्रज्ञान आणि निर्यात यातून देशाची प्रगती होईल. तुम्ही आत्मविश्वासाने देशाला पुढे घेऊन जा.”

“ही डॉक्टरेट पदवी माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. जागतिक बायोइकॉनॉमी क्षेत्रातील माझ्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल विद्यापीठाचे मी आभार मानतो,” असे प्रमोद चौधरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, हवामान बदल हा मानवी अस्तित्वासाठी धोका ठरत आहे. भारताकडे बायोमास आणि शेतमालाचे अवशेष यांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातून बायोफ्युएल, बायोकेमिकल यांची निर्मिती शक्य आहे. यातून देशाला इंधन सुरक्षा लाभणार असून पर्यावरणपूरक शाश्वत विकास साधता येणार आहे.

डॉ. पी. एन. राजदान म्हणाले, “जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत लिथियमचा ५.९ दशलक्ष टन साठा शोधण्यात यश आले आहे. यातून प्रचंड आर्थिक विकास होणार आहे. सन २००० मध्ये हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हा त्यात सहभागी होण्याची संधी मलाही मिळाली होती.” देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. आपली पिढी गुणवान असून त्यांना घडविण्यासाठी विद्यापीठांना अधिक सक्षम व्हावे लागेल

३३ सुवर्णपदके आणि १४ पी.एचडी.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे

“डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (पिंपरी) गेल्या दोन दशकांत देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. मेडिकल, दंतवैद्यक शास्त्र, नर्सिंग, फिजिओथेरपी, बायोटेक, आयुर्वेद, होमिओपॅथी, मॅनेजमेंट आदी विद्याशाखांना नॅक व एनआयआरएफ रँकिंगमध्ये सातत्याने उच्चश्रेणी प्राप्त झाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणाला (एनईपी) अनुकूल अभ्यासक्रम राबविण्याची सुरुवात विद्यापीठाने केली आहे. तसेच, डी. वाय. पाटील हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये संपूर्ण देशात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, नेत्रपटल प्रत्यारोपणाच्या तब्बल तीनशेहून अधिक  शस्त्रक्रिया हॉस्पिटलने गेल्या तीन-चार वर्षात यशस्वीपणे केल्या आहेत.” डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page