गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली नाट्यसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
गडचिरोली : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठ येथे 5 मार्च 2024 रोजी एक दिवसीय झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर नाट्यसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या नाट्यसंमेलनात एकांकिका स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
झाडीबोली नाट्यसंमेलनाच्या पहिल्या सत्रात एकांकिका स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, जनता महाविद्यालय चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिंडाळा(ता.नागभीड), स्वर्गवासी निर्धनराव वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदींनी या एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर दुसऱ्या सत्रात एकपात्र अभिनय स्पर्धेत नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, श्रीराम वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा, आदर्श महाविद्यालय वडसा, स्वर्गवासी निर्धनराव वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि जनता महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयानी एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
एकांकिका व एकपात्री अभिनय स्पर्धांचा निकाल –
या एकांकिका व एकपात्री अभिनय स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये एकांकिका स्पर्धेत श्रीपाद जोशी लिखित मूक आठवांची रात्र या विषयात सर्वोत्कृष्ट एकांकिका पुरस्कार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीला मिळाला. उत्कृष्ट पुरस्कार लेखक डॉ. योगेश दुधपचारे यांच्या मानव व वन्यजीव संघर्ष एकांकिकेस जनता महाविद्यालय चंद्रपूर, तसेच लेखक अंकुश ठाकरे यांच्या गोपाळाची आम्ही लेकरं या एकांकिकेस गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरीस पुरस्कार देण्यात आला.
एकपात्री अभिनय स्पर्धेत आदर्श महाविद्यालय वडसा येथील विद्यार्थिनी साक्षी दिलीप ऊईके हिेने प्रथम, गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थिनी अस्मिता सागरकर हिने दुसरा क्रमांक तर नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थी सचिन उमेश राऊत याने तिसरा क्रमांक मिळविला.
तर सर्वोत्कृष्ट संहितालेखन स्पर्धेत डॉ. योगेश दूधपचारे यांच्या मानव व वन्यजीव संघर्ष या विषयास सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनात ग्रामगीता महाविद्यालय चिमूर, सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनयात सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थिनी स्मृती उईके हिला “उजेड अजून सरला नाही” या नाटकाच्या आई भुमीकेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार तर सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनयात “मूक आठवांची रात्र” या नाटकाच्या भूमिकेसाठी डॉ. शुभम गुरुनुले यांना सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय पुरस्कार विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
झाडीबोली नाट्यसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हेमराज निखाडे, प्राध्यापक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.