पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘युवा स्पंदन’ सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ

कलेतून भारतीय संस्कृती जपा: ज्येष्ठ गायक प्रशांत देशपांडे

सोलापूर |

ओवी, अभंग, अंगाई गीत, लोकनृत्य व विविध लोककलेच्या माध्यमातूनच भारतीय संस्कृती शतकानुशतके जिवंत राहिली आहे. या कलांमुळेच आपली सांस्कृतिक ओळख टिकून असून, आजच्या तरुण पिढीने या लोककलांची उपासना करून भारतीय संस्कृती जपावी, असे आवाहन ज्येष्ठ गायक व संगीतकार प्रशांत देशपांडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव २०२५–२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी विद्यापीठ परिसरात प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते झाला. उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

The 'Yuva Spandan' cultural festival commenced with grandeur at Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University.
The ‘Yuva Spandan’ cultural festival commenced with grandeur at Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी ‘युवा स्पंदन’ महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांची सर्जनशीलता विकसित करणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

मार्गदर्शन करताना प्रशांत देशपांडे म्हणाले की, ओवी, अभंग, गीत, संगीत, नृत्य व नाट्यकला यांमुळेच भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. या कला केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून संस्कृती जपण्याचे प्रभावी माध्यम आहेत. आज कलाक्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना योग्य व्यासपीठ देण्यासाठी ‘युवा स्पंदन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल तसेच आनंददायी व सकारात्मक स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेता येईल.

उद्घाटन समारंभानंतर संकल्पना नृत्य, हिंदी व मराठी वक्तृत्व स्पर्धा, सुगमगायन, मेहंदी, समूहनृत्य आणि फोटोग्राफी अशा विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले, तर डॉ. राजेंद्र वडजे यांनी आभार प्रदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com