ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवातील लावणीवर तरुणाई थिरकली
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात दुसर्या दिवशी मुख्यमंचावर सादर झालेल्या लावणीने तरुणाई थिरकली.
युवक महोत्सवात लावणी या कलाप्रकाराला प्रेक्षकांचा मोठा प्रतीसाद मिळाला. स्पर्धक कलावंतांनी पारंपारिक पद्धतीने लावण्या सादर केल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या अदिती केंद्रे हिने ‘तुम्ही याव सजना, रंग होळीला’ ही शृंगारिक लावणी सादर केली. या लावणीला प्रेषकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची मोठी दाद मिळाली. ‘तुमच्या पुढ्यात कुटते मी’ ही लावणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील ललित व कला संकुलाच्या प्रतीक्षा बुंदराळे हिने सादर केली.
या लावणीला प्रेक्षकांनी मोठी दाद मिळाली. नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेडच्या स्पर्धक यांनी ढोलकीच्या तालावर घुंगराच्या तालावर ही ठसकेबाज लावणी सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
तर दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूरच्या प्राजक्ता फडके, सायली पंडित, रूपाली गायकवाड, शिवकन्या भद्रे, राधिका झिरमिरे या स्पर्धक कलावंताची पारंपरिक पद्धतीने सादर केलेली सांघिक लावणी आणि ‘सवाल जवाब पर जुगलबंदी’ प्रेक्षकांना भावली.
युवक महोत्सवाच्या मुख्यमंचावर सकाळपासूनच लावणी हा कलाप्रकारात वेगवेगळ्या संघाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपली कला सादर केली. लावणी कलाप्रकारात लावणीचे सर्व प्रकार कलावंतांनी सादर केली. त्यास मोठी दाद यावेळी प्रेक्षकातून मिळाली.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ डी एन मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, सल्लागार समितीचे सदस्य डॉ मा मा जाधव, डॉ कमलाकर चव्हाण, डॉ एम आर जाधव, डॉ ज्ञानदेव राऊत, डॉ विजया भोपाळे, डॉ संजय जगताप, डॉ रामचंद्र भिसे, डॉ राजपाल चिखलिकर, डॉ गोविंद रामदिनवार आदी उपस्थित होते.
‘परीक्षकाची लावणी प्रेक्षकांना भावली’
युवक महोत्सवाच्या मुख्यमंचावर कलावंतांनी लावणी सादर केल्या. लावणीच्या तालावर तरुणाई बेधुंद पणे थिरकली. लावणी या कला प्रकाराच्या परीक्षक यांनाही आपल्यातील कला लावणी या नृत्यातून प्रेक्षकांना सादर करून दाखवावी असे वाटले. आणि त्यांना राहवले नहि. लावणी कला प्रकार संपल्यानंतर त्यांनी लावणी हा कला प्रकार विद्यार्थ्यापुढे मुख्यमंचावर सादर केला. त्यांनी सादर केलेल्या लावणी आणि अदाकारि प्रेक्षकांना भावली. परीक्षकांच्या लावणीला टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद दिली. लावणीवर अनेकांने ठेका धरला.