मुक्त विद्यापीठाचा महायान ग्लोबल इक्विपमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार
कौशल्याधारित शिक्षणातून रोजगार र्निर्मिती
यावेळी मनुष्यबळ शिक्षण – प्रशिक्षणाबाबत सामंजस्य हा करार करण्यात आला
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने येथील महायान ग्लोबल इक्विपमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (MGESPL- एमजीईएसपीएल) सोबत कौशल्याधारित शिक्षणातून रोजगार र्निर्मितीसाठी एक महत्वाकांक्षी असा द्विपक्षीय शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया यांच्या पुढाकाराने विद्यापीठ मुख्यालयातील सभागृहात हा करार करण्यात आला.

विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव दिलीप भरड व एमजीईएसपीएलच्या वतीने कार्यकारी संचालक नितीन अहिरे यांनी या करारावर स्वाक्षरी केली. प्रारंभी या करारानुसार बांधकाम, खाणकाम व संबंधित यंत्र व इतर सामग्री व्यवस्थापन संबंधी (Construction, Mining & Material Handling) सहा शिक्षणक्रमांद्वारे व्यवसाय व रोजगाराभिमुख कौशल्य आधारित शिक्षण – प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाशिक येथे त्यानुसार पहिले प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येईल.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा संजीव सोनवणे, अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेन्द्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ संजीवनी महाले, अशोका समुहाचे डॉ दत्ता गुजराथी, विद्यापीठाचे निरंतर शिक्षण विद्याशाखा तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, प्रा निलेश ठाकरे, एफसीपी पुणेचे संचालक निलेश कटारिया व अनुप पिल्लाई, एफसीपी सल्लागार अनिल जोशी, अशोका एज्युकेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला, विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्राचे संचालक डॉ मधुकर शेवाळे, वाणिज्य व व्यवस्थापण विद्याशाखा संचालक डॉ सुरेंद्र पाटोळे, संगणक विद्याशाखा संचालक माधव पळशीकर, मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ सज्जन थूल, आरोग्य विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ रश्मी रानडे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे म्हणाले की जगभरात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर जगात डाटा, पाणी आणि खाणकाम यांना महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे यातील कौशल्यप्राप्त व्यक्तींना व्यवसाय व रोजगाराच्या अधिक संधी आहेत. अजग बदलत असतांना आपल्या राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण करणे व पुढील पिढीसाठी नैसर्गिक संसाधन कायम ठेवणे हे अशा सामंजस्य कराराचे उद्दिष्ट्य असल्याची पुस्ती कुलगुरू प्रा सोनवणे यांनी अखेरीस जोडली.
अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया याप्रसंगी बोलतांना म्हणाले की या करारामुळे मुक्त विद्यापीठाचे छत्र प्राप्त होवून संबंधित शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रमाणीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी प्राप्त होणार असून भविष्यात या शिक्षण – प्रशिक्षणाचे अधिक केंद्र उघडून कराराचेही विस्तारीकरण करण्यात येईल असे कटारिया म्हणाले. एमजीईएसपीएलच्या कार्यकारी संचालक नितीन अहिरे म्हणाले की जगभरात यंत्रसामग्रीचा इंधन, दुरुस्ती खर्च कमी कसा करता येईल व कार्यक्षमता कशी वाढवता येईल यावर संशोधन करून त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जातो. मात्र सदर यंत्रसामग्री संबंधी काम करणारे मनुष्यबळ यांच्या शिक्षण – प्रशिक्षणाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. सदर कराराद्वारे देश विदेशातील बांधकाम, खाणकाम व संबंधित यंत्र व इतर सामग्री व्यवस्थापन संबंधी उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवले जाईल असा विश्वास अहिरे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात विद्यापीठाचे निरंतर शिक्षण विद्याशाखा तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम यांनी चीनच्या बरोबरीने भारत देश जगाला कुशल मनुष्यबळ पुरवठा करू शकतो याकडे आकडेवारीसह लक्ष वेधले. कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले. डॉ माधुरी खर्जुल यांनी सूत्रसंचलन केले.