महाराष्ट्रातील कारागृहातील बंदी बांधवव भगिनी यांचेसाठी मुक्त विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या मार्फत महाराष्ट्रातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेले  बंदी बांधव व भगिनी यांना विविध पदवी व पदविका शिक्षणक्रम पूर्ण करता यावेत यासाठी विद्यापीठाने २०१४ पासून बंदी बांधवांना विविध शिक्षणक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली होती. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामध्ये २०१७ साली सामंजस्य करार झाला होता. त्याचा आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध कारागृहातील बंदी बांधव व भगिनींनी विद्यापीठाच्या पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षणक्रम पुर्ण करून लाभ घेतला आहे.

त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणून कारागृहात शिक्षा भोगत असताना बंदी बांधवांची विचार प्रणाली बदलावी त्यांना विविध विषयाचे ज्ञान अवगत व्हावे. शिक्षा भोगत असलेले उच्च विद्या विभूषित बंदी बांधव यांच्या ज्ञानाचा उपयोग इतर बंदी बांधवांना व्हावा, त्यांची मानसिकता बदलावी या हेतूने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्व कारागृहातील बंदी बांधव व भगिनी यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याशी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे शिक्षण दिनाचे औचित्य साधून नव्याने मुक्त विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.

कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी बांधव व भगिनी यांना कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये ताठ मानेने जगता येईल व त्यांना स्वतःचे व्यवसाय किवा नोकरी सुरु करता येईल यामुळे त्यांची कुटुंबाची सर्वांगीण मदत होण्यास मदत होईल. तसेच समाजामध्ये वेगळा संदेश जावून एक वेगळी प्रतिमा तयार होईल या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे.

Advertisement

याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी सांगितले की, ज्ञानगंगा घरोघरी हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे आणि आपल्या ह्या घरामध्ये ही ज्ञानगंगा घेऊन येणे हे विद्यापीठाचे महत्वाचे कर्तव्य आहे. याचा लाभ जास्तीत जास्त बंदी बांधवांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रातील विविध कारागृहातील बंदी बांधव व भगिनींनी विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना शुल्क विरहित प्रवेश असणार आहे, असेही कुलगुरूंनी यावेळी नमूद केले.           

प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, सुधार सेवा हा शब्द आपल्या संस्थेच्या नावात नमूद केलेला आहे, या सामंजस्य करारामुळे खऱ्या अर्थाने त्यास अर्थ प्राप्त झाला आहे. आपणास शिक्षणाची मोठी संधी प्राप्त झाली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी उपस्थित बंदी बांधवांना सांगितले.

याप्रसंगी डॉ जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. तसेच सामंजस्य कराराबद्दल त्यांनी मुक्त विद्यापीठाचे आभार देखील मानले. सुनील ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह यांनी कार्यक्रमास उपस्थीतांचे आभार मानले. कार्यक्रमास मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ व्ही बी गायकवाड, पल्लवी कदम, अतिरिक्त अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, श्रीकांत जावरकर, संशोधन अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय, तसेच मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, उत्तम जाधव, सहयोगी सल्लागार (प्रशासकीय), विभागीय केंद्र पुणे, त्याचप्रमाणे कारागृहातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page