यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माळी प्रमाणपत्र शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर मोठा प्रश्न असतो तो करिअरचा. दहावीनंतर कोणते करिअर निवडावे याची चिंता विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना नेहमी सतावत असते. जर विद्यार्थी दहावी नापास असेल तर अजून त्यांच्या पालकांसमोर प्रश्न पडलेला असतो ? परंतु आता चिंता करायची गरज नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी उत्तीर्ण विद्यार्थांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरु केला आहे. सदर शिक्षणक्रम मुक्त विद्यापीठाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील विविध ६५ कृषी अभ्यास केंद्रावर चालविला जातो.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

शिक्षणक्रमाची वैशिष्ट्ये

माळी  प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना झाडांची छाटणी करणे, झाडांना आकार देणे, पिशव्या भरणे, फुलझाडे, फळझाडे, रोपवाटिका आणि बागकाम व्यवस्थापनाविषयी शिक्षण दिले जाते. तसेच फळे, भाजीपाला आणि फुलांचे महत्त्व, त्यांना लागणारे हवामान, जमीन, लागवडीच्या विविध पद्धती, बागेसाठी लागणारी जमीन, तिचा विकास, संरक्षण, बागेची आखणी आणि लागवड, बागेसाठी लागणारे सेंद्रिय आणि रासायनिक खते, बागेसाठी पाण्याचे नियोजन आणि आच्छादनाचा वापर कसा करावा या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सदर शिक्षणक्रमामध्ये बागेतील फळझाडांना वळण देण्याची व आधार देण्याची आवश्यकता आणि पद्धती, फळ झाडांची छाटणी व त्यांच्या विविध पद्धती, फळ झाडांचे उत्पादन वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतीची माहिती, फळ झाडांचा बहार धरण्याचे तंत्र, फळ बागांमध्ये संजीवकांचा वापर, बागेतील अंतरपिकाचे महत्त्व, विविध पिकांतील तणांचे नियंत्रण, फळझाडे व भाजीपाला पिकांवरील महत्वाचे रोग व किडी नियंत्रण, फळे, भाजीपाला आणि फुलांची काढणी व हाताळणी बद्दल सखोल माहिती देण्यात आली आहे.

या शिक्षणक्रमामध्ये फळझाडे जसे कि आंबा, चिकू, पपई, पेरू, अंजीर, केळी, लिंबू वर्गीय पिके, डाळिंब, आवळा, सुपारी,  काजू, नारळ, चिंच, बोर, सीताफळ यासारख्या पिकांबरोबर भाजीपाला टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, लसून, बटाटा, भेंडी, मूळ भाजी व कंद भाजी, शेवगा, हादगा, कढीपत्ता, कोबीवर्गीय पिके, वेलवर्गीय पिके आणि शेंगा वर्गीय पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची सर्व माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर या मध्ये गुलाब, झेंडू, ॲस्टर, झिनिया, कार्नेशन, जरबेरा, गेलार्डीया, निशिगंध, ग्लॅडिओलस, लिली आणि जस्मिन  या सारख्या फुलांची सर्व माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

उद्यान आणि फलोद्यान विषयाचे महत्व अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. निरनिराळी पिके व  त्यांचे उत्पादन या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्यासाठी रोपवाटिका महत्वाची आहे. त्यामुळे सदर शिक्षणक्रमात रोपवाटिका व्यवस्थापनेविषयी, रोपवाटिका स्थापनेबद्दलचे सर्व तंत्रज्ञान, परसबाग, टेरेस गार्डन, बोन्साय, कॅक्टस, लॉन, पाण्यात वाढणाऱ्या शोभिवंत वनस्पती, खडखबाग सारखे नवनवीन आणि आधुनिक तंत्रज्ञांनाची सखोल माहिती या शिक्षणक्रमात देण्यात आली आहे.

ज्या लोकांना बागकाम क्षेत्रामध्ये आवड आहे त्या लोकांसाठी हा शिक्षणक्रम अतिशय उपयुक्त आहे. उत्तीर्ण विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय, वेगवेगळ्या रोपवाटिका, वास्तूंचे सुशोभीकरण, परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड, फळबाग लागवड, विविध घरगुती, सांस्कृतिक कार्यक्रमातील फुलांची सजावट, भेटवस्तू निर्मिती, दवाखाने, खाजगी कार्यालयातील बाग-बगीचा देखभालीचे कंत्राट, शासकीय कार्यालयातील परिसर सुशोभीकरणाचे कंत्राट, कृषी विभाग, शासकीय विभाग व निमशासकीय विभाग इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम मराठी भाषेतून असून, हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून नववी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. हे शिक्षणक्रम दूरस्थ पद्धतीने राबविले जात असून दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दिवशी संपर्कसत्रे अभ्यासकेंद्रावर आयोजित केली जातात. शेतकरी, शेतमजूर, शहरी महिला व पुरुष तसेच इतर ज्यांना बागकामामध्ये आवड आहे अशा लोकांना ही एक सुवर्ण संधी आहे. माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रमाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु झाले आहेत. दि १९ जून २०२४ पूर्वी आपले अर्ज पूर्ण भरावेत. ज्यांना १९ जून २०२४ पर्यंत अर्ज भरणे शक्य होणार नाही त्यांना १८ जुलै च्या स्पॉट राउंडमध्ये प्रवेश मिळू शकेल. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला http://ycmou.digitaluniversity.ac OR http://www.ycmou.ac.in भेट द्यावी.

प्रवेश प्रक्रियाच्या महत्वाच्या तारखा पुढील प्रमाणे :

1.         प्रथम प्रवेश अर्ज (Online-Admission Form) भरण्याचा कालावधीः 01 ते 19 जून, 2024

2.         प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक :  26 जुन, 2024

3.         प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (First Merit List Admission Round) कालावधीः 27 ते 02 जुलै, 2024

4.         दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 08 जुलै 2024

5.         दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (Second Merit List Admission Round) दिनांकः 09 ते 12 जुलै, 2024

6.         शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक : 16 जुलै, 2024

7.         शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी : 18 जुलै 2024 सदर शिक्षणक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश असे आवाहन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page