यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दीपावली सणानिमित्त ऑनलाईन काव्योत्सव मैफल संपन्न
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्या शाखेंतर्गत कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्र विभागातर्फे दीपावली सणानिमित्त ऑनलाईन काव्योत्सव मैफल घेण्यात आली. त्यात नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रमाच्या २५ विद्यार्थ्यांनी मराठी – हिंदी, स्वरचित व नामांकित कवींच्या गाजलेल्या कविता, गझल सादर करून मैफल सजवली. निरंतर विद्याशाखेचे संचालक प्रा डॉ जयदीप निकम या मैफलीच्या अध्यक्षस्थानी होते.
नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार व नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी या काव्योत्सव मैफलीचे उद्घाटन केले. कुठलेही नाटक हे मुळात एका काव्याचे विस्तारित रूप असते असे ते म्हणाले. हल्ली मोबाईल व विविध समाज माध्यमांमुळे बऱ्याचदा प्रत्येकजण अनिर्बंध पणे व्यक्त होत असतो. त्यामुळे ऐकणारा व खास श्रोता वर्ग कमी होत चालला असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्वलिखित आपली एक काव्यरचना देखील सादर केली.
त्यानंतर सुजाता मराठे (विहीर), समता जाधव – आज आषाढी अशी, कल्याणी वाशीकर (माझे माहेर), आकाश कदम (आजादी), पंकज ठाकरे (स्वीच्ड ऑफ होण्याच्या आटोकाट प्रयत्नात), वीणा यार्दी (मराठी गझल – पावसाळे ओळखीचे), अशोक जाधव (आई), इग्नेशियस डायस (हताशा से एक व्यक्ति बैठा था), प्रभा तिरमारे (गाव), सार्थक सुरडकर (पंढरीची वारी), मनोज पवार (मराठी गझल – पांडुरंगा), डॉ. सुनीता वाघमारे (तुम्ही आम्ही आणि आमचं गाणं), फेलिक्स डिसोजा (जफर आणि मी), अनिल थेटे (बातमीचा बॉंब), भाऊराव झोले (बाप), जयेश चौधरी (खोप्या मधी खोपा) संगिता प्रभू (अंतरीही रात आहे), मोनिका अप्तुरकर (स्वच्छंदी जग), संजना साबळे (देव म्हणजे काय?), आर्यन निकम (हिंदोळा), कुणाल खैरनार (वेळ कमी आहे), सार्थक सुरडकर (पंढरीची वारी), राहुल गोवर्धने (गावातल्या वातावरणातील स्तब्धता), रोहन गांगुर्डे (जहान), आकाश गोवर्धने (गाव), तेजस सूर्यवंशी (तो) अशा विविध भास्वरातील रचना सादर झाल्या.
रेणुका हजारे व जुबेन अलिफ यांनी सूत्रसंचलन केले. नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी संयोजन केले. श्रीकृष्ण वैद्य यांनी आभार मानले.