यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि कुलसचिव दिलीप भरड तसेच वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. याप्रसंगी कुलगुरूंना आलेला खुप वर्षापुर्वीचा अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितला की, आझाद हिंद सेनेमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केलेल्या सैनिकासोबत त्यांना संवाद साधता आला. सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केल्यामुळे, त्या सैनिकाच्या नसात, मनात, आणि विचारात तसेच वर्तनातून राष्ट्रभक्ती व सुभाषचंद्र बोस दिसले असेही कुलगुरूंनी शेवटी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त करतांना कुलगुरूंनी सांगितले की, लोकांच्या मनात काय आहे, ते बाळासाहेब जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपले विचार व्यक्त करत असत. त्यामुळेच मराठी माणसाच्या ह्यदयावर त्यांनी अधिराज्य गाजवले. या दोन्ही महापुरुषांचे आदर्श विचार आपण घेतले, तर खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजील ठरेल, असेही शेवटी त्यांनी सांगितले. याप्रसंगी कुलसचिव डॉ. दिलीप भरड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष साबळे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.