यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय मानसशास्त्रीय चाचणी विकसन कार्यशाळा
नाशिक : मनुष्य मुळात त्याच्या उत्पत्तीपासून इतर प्राण्यांसारखाच होता, परंतु त्यास विवेकवादी बनवण्याचे काम मनाच्या संस्कारांनी केलेले आहे. मनाच्या संस्कारांचा व व्यक्तीच्या वर्तनाचा परीघ हा अथांग आहे आणि शिक्षणशास्त्र हे व्यक्तीच्या वर्तनावर, संस्कारांवर आधारित आहे. त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास करणे व त्याअनुषंगाने मानसशास्त्रीय चाचण्या विकसन करणे हे महत्वाचे व क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.

विद्यापीठात शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानसशास्त्रीय चाचणी विकसन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका डॉ. संजीवनी महाले, सुप्रसिद्ध मानसशास्त्र अभ्यासक प्रा. दत्तात्रय तापकीर, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा संचालक श्री. नागार्जुन वाडेकर, डॉ. राजश्री कापुरे उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर व्याख्यानात बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे पुढे म्हणाले की वस्तुस्थिती हा संशोधनाचा प्रमुख आधार आहे. मन समजून घेण्याचे थेट शास्त्रीय साधन नाही त्यामुळे वर्तनावरून ते जाणण्याचा प्रयत्न होत आला आहे. मानसशास्त्रीय चाचण्या हा त्यासाठीचा शास्त्रीय आधार आहे. या क्षेत्रात हिमनगावरील सुईच्या टोकाएवढे काम झाले आहे. या विषयात व क्षेत्रात शास्त्रीय संशोधन कामाला मोठा वाव असल्याचे मा. कुलगुरू प्रा. सोनवणे आपल्या व्याख्यानाच्या शेवटी म्हणाले. त्यानंतर मानसिक क्षमता शोध चाचण्यांची विविध क्षेत्र निश्चिती (प्रा. दत्तात्रय तापकीर), मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार (डॉ. राजश्री कापुरे) व मानसशास्त्रीय चाचण्यांची निश्चिती व प्रश्न निर्मिती प्रक्रिया (डॉ. प्रणीता जगताप) याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत राज्यभरातील मानसशास्त्राचे एकूण ६३ संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व तज्ञ व्यक्ति सहभागी झालेले आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका डॉ. संजीवनी महाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साधना तांदळे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सुत्रसंचलन श्री. प्रमोद वाघ यांनी केले तर मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा संचालक श्री. नागार्जुन वाडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.