यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संगणक परीक्षेत आधुनिक तंत्राचा वापर
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान प्राप्त होण्यासाठी विद्यापीठामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्टीफीकेट इन कॉम्पुटर ऑपरेशन ब्लाइंड या शिक्षणक्रमाची परीक्षा विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत विभागाच्या संगणक कक्षात नुकतीच झाली. आधुनिक संगणक तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा देता यावी यासाठी विद्यापीठाने विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. ज्याद्वारे या विद्यार्थ्यांना प्रश्न ऐकता येतात आणि उत्तरांचे पर्याय निवडून योग्य उत्तर निवडता येते. या परीक्षेकरिता एकूण ३३ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी २६ विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत पार पडली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सफाईदारपणे संगणक हाताळणाऱ्या या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, ग्रंथालय प्रमुख, डॉ. मधुकर शेवाळे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे, उपग्रंथपाल, डॉ. प्रकाश बर्वे, परीक्षा कक्ष २ चे उपकुलसचिव मनोज घंटे उपस्थित होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बहिस्थ पर्यवेक्षक प्रवीण सुर्वे व शिक्षणक्रम सहायक जितेंद्र बोरसे यांचे सहकार्य मिळाले.