यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा महिला सक्षमीकरणासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे महिला सक्षमीकरणासाठी पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेसोबत (एमकेएसएसएस – एआयटी, सेंटर फॉर डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि ए.आय.) सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याअनुषंगाने दोन्ही संस्थांतर्फे केवळ महिलांसाठी म्हणून संगणक आधारित ‘डेटा ॲनालेटीक्स विथ इंटर्नशिप’ हा शिक्षणक्रम सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सभागृहात झालेल्या बैठकीत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माहिती व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या संचालिका संपदा वर्धे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक माधव पळशीकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परीक्षा संयोजक रेवती पवार तसेच विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विद्याशाखेचे डॉ. योगेश वाघडकर, डॉ. प्रकाश खनाळे, मिलिंद देशपांडे व उज्वला महाजन हे उपस्थित होते.
महिलांना शिक्षण देतांनाच त्यांच्यातील कौशल्ये विकसित व्हावीत, त्यांना संबंधित औद्योगिक क्षेत्रात रोजगार व अनुभव मिळावा या हेतूने हा शिक्षणक्रम सुरु करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीच्या या प्रमाणपत्र शिक्षणक्रमात एक्सेल, पायथॉन, एसक्यूएल, पॉवर बी. आय. आदी तांत्रिक गोष्टींचे शिक्षण दिले जाईल. हा शिक्षणक्रम केल्याने मशीन लर्निंग आणि ए. आय. डेटा व्हिज्युलायजेशन मध्येही प्रभुत्व मिळविणे महिलांना शक्य होईल. त्यात प्रगत विश्लेषण तंत्राचेही ज्ञान दिले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सदर शिक्षणक्रम संयोजन, मूल्यमापन व प्रमाणित करण्याचे कार्य करणार आहे. या शिक्षणक्रमामुळे डेटाचलित अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधींमध्ये महिलांना रोजगार प्राप्त होवू शकेल. शिक्षण व कौशल्य विकासाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या १२८ वर्शांप्पासून कार्यरत असणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिला शिक्षणाचा वारसा तंत्रज्ञानाच्या काळात पुढे नेण्यासाठी आणि सुलभ पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रयत्न करणार आहे.