यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनामार्फत नवोदित कवींच्या पहिल्या प्रकाशित काव्यसंग्रहास विशाखा काव्य पुरस्कार दिले जातात. त्यानुसार सन २०२२ व सन २०२३ या दोन वर्षासाठी इच्छुक व पात्र नवोदित कवींनी आपले काव्यसंग्रह येत्या दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत विद्यापीठात केवळ टपालाने पाठवावेत असे आवाहन विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे करण्यात आले आहे. सदर पुरस्कारासाठी यापूर्वीच्या आवाहनात नमूद केलेली वयोमर्यादेची अट आता रद्द केल्यामुळे विद्यापीठातर्फे हे पुन्हा आवाहन करण्यात आलेले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्यात आलेले आहे. या अध्यासनातर्फे कुसुमाग्रज यांच्या सुप्रसिद्ध अशा ‘विशाखा’ या काव्यसंग्रह नावाने नवोदित कवींच्या मराठी भाषेतील प्रथम काव्यसंग्रहास पुरस्कार दिले जातात. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्काराची नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे. यंदा सन २०२२ व सन २०२३ या दोन वर्षातील काव्यसंग्रहांसाठी प्रत्येकी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी काव्यसंग्रह प्रकाशन कालावधी हा अनुक्रमे दिनांक १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ व दिनांक ०१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ असावा. पुरस्कार अर्जासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. काव्यसंग्रह मात्र हा केवळ मराठी भाषेतील, त्यावर प्रकाशन वर्ष ठळकपणे नमूद केलेले असावे आणि त्याआधी त्याची ई – आवृत्ती प्रकाशित झालेली नसावी. पुरस्कारासाठी यापूर्वी असलेली वयोमर्यादेची अट काढून टाकण्यात आलेली आहे. पुरस्कारासाठी कवी स्वतः किवा प्रकाशक किंवा कवीचे हितचिंतक अर्ज पाठवू शकतात, अर्जासोबत काव्यसंग्रहाच्या पाच प्रती, कवीचे पारपत्र आकाराचे दोन छायाचित्रे, परिचयपत्र, कवीचा प्रथमच काव्यसंग्रह असल्याचे प्रतिज्ञापत्र पाठविणे बंधनकारक आहे.
प्रतिज्ञापत्र जोडले नसल्यास, काव्यसंग्रह विचारात घेतला जाणार नाही. परिचयपत्रात कवीचा संपूर्ण पत्ता, इमेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद असावा. कवितासंग्रह टपालानेच पाठवावेत, खाजगी कुरीयरने पाठवू नयेत. पाकीटावर ‘विशाखा काव्य पुरस्कारासाठी’ असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्जासोबत पाठविलेल्या काव्यसंग्रह प्रती परत केल्या जाणार नाहीत. यापूर्वी या पुरस्कारासाठी ज्यांनी काव्यसंग्रह पाठवले आहेत, त्यांनी पुन्हा पाठवू नयेत. पुरस्कारासंबंधी विद्यापीठ व निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. या पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक कवींनी आपले काव्यसंग्रह येत्या दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रमुख, कुसुमाग्रज अध्यासन, ज्ञान स्रोत केंद्र इमारत, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,गोवर्धन, नाशिक – ४२२२२२ या पत्यावर केवळ टपालाने पाठवावेत. सदर पुरस्कार संदर्भातील अधिक माहिती व नियमावलीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी असे पुन:आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.