मुक्त विद्यापीठात ‘यशवंतराव चव्हाण यांची जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी
नाशिक : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते ते यशवंतराव चव्हाण आधुनिक भारताच्या मूल्याधिष्ठित समाजकारणाचा पाया रचणारे द्रष्टे नेते होते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांच्या 111 व्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस, तसेच विद्यापीठाच्या आवारातील त्यांच्या पुर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
फोटो ओळी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘यशवंतराव चव्हाण यांची जयंती’ साजरी करण्यात आली. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, समवेत कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आदी. (छायाचित्र : राजेश बर्वे)
आपले विचार व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, नाशिकच्या दृष्टीने दोन महत्वाच्या बाबी म्हणजे – यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधीत्व केले होते आणि दुसरी बाब म्हणजे त्यांच्या नावाने स्थापन झालेले मुक्त विद्यापीठ ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्याशी समरस आपल्या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे, ही एक समाधानाची बाब आहे.
परस्पर संवादातून अनेक गोष्टी साध्य होतात, अनेक प्रश्न सुटतात यावर यशवंतराव चव्हाण यांचा विश्वास होता. अनेक वाद, प्रश्न हे केवळ परस्परांवरील आरोपप्रत्यारोपातून सुटत नसतात. भारतीय विचारमूल्य व्यवस्था ही संवादावर कायम भर देत आली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी याच मूल्यांची शिकवण आधुनिक महाराष्ट्राला दिली आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सोबत यशवंतराव अनेकदा चर्चा करत असत. अनेक प्रश्नांवर तर्कतीर्थांचे ते मार्गदर्शन घेत असत. त्यांच्या सोबतचा त्यांचा प्रगल्भ वादसंवाद ही महत्वाची गोष्ट होती. ही संवादाची परंपरा यशवंतरावांनी, महाराष्ट्राने या जगाला दिली. यशवंतराव चव्हाण यांचे आचरण आपण देखील आपल्या जिवनात अंगिकारले पाहिजे असेही शेवटी कुलगुरूंनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दयाराम पवार यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.