जखमेवर लावा आता कृत्रिम त्वचा; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे संशोधन 

संशोधकांनी शोधली अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधकांनी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा शोधून काढली आहे. संशोधकांच्या संशोधनामुळे आता जखमेवर मलमपट्टी न करता कृत्रिम त्वचाच लावता येणार आहे. विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले आणि लिटूच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ आरती शनवारे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ बिपिन लाडे यांच्या मदतीने हे संशोधनकार्य पूर्ण केले आहे.

जखम झाली की मलम लावत पट्टी बांधायची अशी वर्षानुवर्षे पद्धत आहे. मात्र, या मलमपट्टी ऐवजी विद्यापीठाच्या संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा जखमेवर लावता येणार आहे. जखम झालेल्या जागेवर पट्टीच्या ऐवजी या कृत्रिम त्वचेचा तुकडा लावल्याने जखम सुकेल आणि बरी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या औषधीय घटकांचा वापर या कृत्रिम त्वचेत करण्यात आला आहे. या त्वचेमुळे जखम झाकली जाईल आणि बरीही होईल. जखम झालेल्या ठिकाणी कमी वेळात नैसर्गिक त्वचा येण्यासही या संशोधनामुळे शक्य होणार आहे. सोबतच ही त्वचा जैवविघटनशील असल्याने जखमेवर काढून टाकल्यानंतरही ती आपोआप विघटित होईल आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही. 

Advertisement

राजीव गांधी जैविक तंत्रज्ञान (आरजीबीसी) प्रकल्प अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर वनस्पती विभागाने संक्रमण रोखण्यासाठी आणि जखमांच्या बरे होण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली नवीन कृत्रिम त्वचा विकसित करण्याबाबत २०१९-२०२० मध्ये संशोधनास सुरुवात केली. या नाविन्यपूर्ण संशोधनाकरिता आवश्यक सामग्रीत सोडियम अल्जिनेट, जिलेटिन, किटोसन आणि अँटीमायक्रोबियल एजंट यांचा समावेश आहे. ज्यामुळे उच्च दर्जाच्या जखमा लवकर बरी होण्याकरिता मदत मिळेल. बायोटेक्नोलॉजीचे विद्यार्थी आकाश कांदी यांनी संशोधन कार्यात सहभाग घेतला. 

नाविन्यपूर्णता

जखमांवर मलमपट्टी करण्याची वर्षानुवर्षीची पद्धत अनेकदा संक्रमण रोखण्यात अपयशी ठरते. त्यामुळे या समस्यांवर उपाय म्हणून संशोधकांनी सोडियम अल्जिनेट, जिलेटिन आणि किटोसन यांचा वापर करून कृत्रिम त्वचा तयार केली. संशोधकांनी पर्यावरणास अनुकूल अशा घटकांचा वापर केला. कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचेसारखी दिसू शकते. 

मुख्य वैशिष्ट्ये

संशोधकांनी निर्माण केलेल्या कृत्रिम त्वचेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असून ज्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि थायमॉल यांचा समावेश आहे. यातील नैसर्गिक गुणधर्म जंतूंना मारत संक्रमण रोखण्यास मदत करते. 

सुरक्षा

संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचे करिता हानिकारक नसल्याचे विविध चाचण्यांमधून दिसून आले. 

जखम बरे होणे

अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने जखम लवकर सुकत बरी होण्यास मदत मिळणार आहे. याकरिता कृत्रिम त्वचेमध्ये समाविष्ट असलेल्या विविध औषधी गुणधर्म जखम लवकर बरी करण्याची क्षमता आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page