महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक योग दिनानिमित्त योगवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय योग संस्थान मधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प, समवेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, आदी अधिकारी व कर्मचारी यांनी योगवर्गात सहभाग नोंदवला.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यावर्षीदेखील ‘महिला सक्षमीकरणासाठी योग‘ अशी थीम ठेवण्यात आली आहे. आधुनिक जीनशैलीमुळे होणारे रोग टाळण्यासाठी योग अभ्यास, आहार व प्राणायम महत्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नियमित योगासने करावित जेणे करुन सर्वजण निरोगी आणि सशक्त होईल. आरोग्यदायी आणि रोगमुक्त जीवनासाठी प्रत्येकाने योगाभ्यास व प्राणायम करावा. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो असे त्यांनी सांगितले.
जागतिक योग दिनानिमित्त विद्यापीठात भारतीय योग संस्थान, नाशिक येथील जिल्हा प्रधान अधिकारी संगीता तुंगार, केशव तुंगार मार्गदर्शनाखाली दंडस्थितीतील आसने, बैठकस्थितीतील आसने, शयनस्थितीतील आसने, कपालभाती व प्राणायाम आदी योगप्रकारातील क्रिया उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी केल्या. या योग अभ्यासवर्गात आशा कमोदकर, विंदू पंडीत, श्रीमती जास्वंदी पाटील यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. या योगवर्गाकरीता डॉ गितांजली कारले, डॉ अनुश्री नेटके, विनायक ढोले, कृष्णा भवर, पुष्कर तऱ्हाळ, नाना परभणे यांनी परिश्रम घेतले. या योगवर्गास विद्यापीठातील अधिकारी डॉ प्रदीप आवळे वरुण माथूर, श्वेता तेलंग, अनंत सोनवणे आदी अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.