एमजीएम विद्यापीठात ‘वर्ल्ड वाइड वेब डे’ करण्यात आला साजरा
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत ‘वर्ल्ड वाइड वेब डे’ दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे रुक्मिणी सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री गुरु गोविंद सिंगजी इंस्टीट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ मनेश कोकरे यांनी ‘चॅलेंजेस अँड रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज इन आर्टिफिशियल इंटेलिजियन्स अँड मशीन लर्निंग’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, विभागप्रमुख प्रा डॉ शर्वरी तामणे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ मनेश कोकरे म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजियन्स आणि मशिन लर्निंग आरोग्य, सेवा, शिक्षण, व्यापार, सुरक्षा आणि कायदा या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. इंटरनेटवरील ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा ब्राउझरद्वारे आपण कोणताही डेटा ॲक्सेस करता, तो सर्व वर्ल्ड वाइड वेबमध्ये येतो. संगणकीय भाषेत, वर्ल्ड वाइड वेब हे ऑनलाइन सामग्री किंवा इंटरनेट सामग्रीचे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज नेटवर्क आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये आता इंटरनेटचे नावही जोडले गेले असून सर्वांच्या जीवनात यांस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. विद्यार्थ्यांनी इंटेरनेटचा वापर स्वत:तील कौशल्य वाढविण्यासाठी करायला हवा. येत्या काळामध्ये या क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी आपणास उपलब्ध होणार असून त्यासाठी आपण अभ्यास करीत कौशल्य विकसित करणे गरजेचे असल्याचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना कुलसचिव डॉ आशिष गाडेकर म्हणाले, सीईआरएनमध्ये काम करत असताना, ब्रिटिश वैज्ञानिक टीम बर्नर्स-ली यांनी १९८९ साली वर्ल्ड वाइड वेब (WWW) चा शोध लावला. जगभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील शास्त्रज्ञांमध्ये माहिती शेअर करण्यासाठी हे विकसित केले गेले होते. WWW ची मूलभूत कल्पना संगणक, डेटा नेटवर्क आणि हायपरटेक्स्टची प्रगत तंत्रज्ञान एक शक्तिशाली आणि वापरण्यास सोप्या अशा जागतिक माहिती प्रणालीमध्ये विलीन करणे होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा डॉ शर्वरी तामणे यांनी केले. प्रा भारत चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयकाची भूमिका निभावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा ए एम मोहसीन यांनी मानले.