देवगिरी महाविद्यालयात जागतिक जल दिन उत्साहात साजरा
पाण्याचे नियोजन हाच विकासाचा राजमार्ग – प्राचार्य अशोक तेजनकर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय येथे भूगर्भशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब यांच्या मार्फत जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रसिद्ध जलतज्ञ प्राचार्य अशोक तेजनकर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो दिलीप खैरणार हे उपस्थित होते. मोनोरेकीने शै. वर्ष २०२३-२४ साठी शांततेसाठी पाणी हा विषय जागतिक पातळीवर वर्षभर अभ्यास, संशोधन, आणि जलसाक्षरतेसाठी दिला आहे.


ह्या अनुषंगाने बोलताना प्राचार्य तेजनकर म्हणाले की, मानवजातीसाठी पाणी ही या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्यासाठी माणसा-माणसांमध्ये, गावां-गावांमध्येच नव्हे तर जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये तणावाचे वातावरण आज निर्माण झाले आहे. त्यामुळे शेती आणि उद्योगासाठी नदी आणि धरणाचे पाणी वापरून विविध भागांमध्ये पाणी वाट्यावरून मतभेद झाले आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गोदावरी खोऱ्यातील पाणी वापरावरून वाद आहेत. हीच परिस्थिती महाराष्ट्र-तेलंगणा (गोदावरी नदी) कर्नाटक-तामिळनाडू (कृष्णा नदी) असे अधिक अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
राज्याचे समतोल विकास होण्यासाठी जल कायदा, राज्या-राज्यामधील पाणी वाटपाबाबतचे करार, न्यायालयीन आदेश ह्याचे सर्वांनी पालन केल्यास तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही. शांततेसाठी पाण्यासोबत पाण्याचे नियोजन, पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा काटकसरीने वापर या क्षेत्रात शासन आणि नागरिकांनी काम केल्यास पुढील काळात निर्माण होणारी पाण्याची तीव्र टंचाई कमी करता येईल.या कार्यक्रमात महाविद्यालयातील उन्नत भारत अभियान व राष्ट्रीय सेवा योजना यांनी दत्तक घेतलेल्या गावात जलदुत म्हणून कार्य केलेल्या स्वयंसेवकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच भूगर्भशास्त्र विभाग, ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसं वितरित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या जागतिक जल सप्ताह निमित्त दि 16 ते 22 मार्च 2024 दरम्यान महाविद्यालयातील विविध विभागांच्या पाणी स्रोताचे सफाई करून त्यावर पाण्याचे महत्त्व प्रतिपादन करणारे घोषवाक्य चिकटविण्यात आले तसेच महाविद्यालयातील पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या विहिरीच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ रंजना गावंडे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ अनंत कनगरे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ भाऊसाहेब शिंदे व भूगर्भशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले