एमजीएम विद्यापीठात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

यशस्वी होण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासणे आवश्यक – कुलगुरू डॉ विलास सपकाळ

छत्रपती संभाजीनगर : खेळ हा आपल्या जीवनाचा भाग असून खेळाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होतो. विशेषत: खेळाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकसित होत असते. सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असून जीवनात यशस्वी होण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठात जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून चिंतनगाह येथे यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संचालक डॉ नितीन घोरपडे, संचालक डॉ रणीत किशोर, संचालक कपिलेश मंगल, विभागप्रमुख डॉ दिनेश वंजारे, डॉ शशिकांत सिंग, प्राध्यापक, विद्यार्थी, खेळाडू व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खेळाला अनन्यसाधारण महत्व दिलेले असून आता खेळाडूंना त्यांचा आवडीचा क्रीडा प्रकार खेळल्यानंतर आपण त्यांना क्रेडिट दिलेले आहेत. महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्यावतीने दरवर्षी अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेचे आपण आयोजन करीत असतो. आजपर्यंत एमजीएम विद्यापीठाने सॉफ्ट टेनिस, सायकलिंग आणि फेन्सिंगच्या स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

विद्यार्थ्यांना एमजीएम विद्यापीठाने जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत केलेली कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद असून येत्या काळात आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील असा मला विश्वास वाटतो. आज आपण जागतिक ऑलिंपिक दिवस साजरा करित आहोत, ही चांगली बाब असून खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत तयारी करणे आवश्यक असल्याचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page