सामाजिक समावेशन व शास्वत विकासासाठी जागतिक बँक कटिबद्ध – डॉ. रोक्सांनी हकीम
कोल्हापूर : जागतिक बँक सामाजिक समावेशन आणि शास्वत विकासासाठी कटिबद्ध असून ती विकसनशील देशांना त्यासाठी पतपुरवठा करीत आहे. समाजातील वंचित वर्गांच्या समावेशनासाठी या बँकेकडून जागतिक पातळीवर विविध विकासात्मक प्रकल्प सुरु आहेत असे प्रतिपादन डॉ. रोक्सांनी हकीम यांनी केले. त्या शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्यावतीने “शास्वत विकास आणि सामाजिक समावेशनाचे उपाय’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याखानामध्ये त्या बोलत होत्या. या प्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता प्रा. एस. एस. महाजन अध्यक्षस्थानी होते.
डॉ. रोक्सांनी हकीम या जागतिक बँकेमध्ये प्रमुख मानववंशशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर शास्वत विकासाची निर्धारित करण्यात आलेली ध्येये लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे असे त्या म्हणाल्या व त्यासाठी जागतिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या संधीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अविनाश भाले यांनी केले. यावेळी जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, डॉ. नंदा पारेकर, डॉ. नितीन माळी, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. प्रल्हाद माने, कुमार कांबळे यांच्यासह विविध महाविद्यालये व अधिविभागातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.