अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबांची दशसूत्रीवर कार्यशाळेचे उद्घाटन
संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर कार्य करुन गावांचा विकास करा – कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांचे सरपंचांना आवाहन
अमरावती : संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर कार्य करुन गावांचा विकास करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी सरपंचांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित ‘संत गाडगे बाबांची दशसूत्री, सरपंचांचे अधिकार व कर्तव्य’ यावर कार्यशाळेचे उद्घाटनपर भाषण करतांना ते बोलत होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कृषिमित्र डॉ संतोष चव्हाण, महाराष्ट्र सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, अध्यासन केंद्र प्रमुख डॉ दिलीप काळे उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर गावागावात कामे करणारा घटक म्हणजे सरपंच होय. गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर मार्गक्रमण केले तर अधिक मोठे कार्य करता येईल. या कार्यशाळेमधून मार्गदर्शन घेऊन त्यावर गावात अंमल केल्यास गावांचा सर्वांगिण होईल. त्यादृष्टीने सरपंच यांनी कार्य करावेप्रमुख अतिथी कृषिमित्र डॉ संतोष चव्हाण म्हणाले, विद्यापीठात शिक्षण घेऊन पुढे शेतक-यांसाठी काय करता येईल, यासाठी तांत्रिक शिक्षण घेतले आणि आज शेतक-यांच्या विकासात जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून भर घालता आली. त्यामुळे आज शेतकरी स्वत: खतनिर्मिती, फळबागा लागवड, विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहेत. ‘शेतीबांधावरची प्रयोगशाळा’ असे नाव देऊन यामाध्यमातून आज शेतक-यांसाठी मोठे कार्य आपण करीत असल्याचे ते म्हणाले. कुलसचिव डॉ तुषार देशमुख म्हणाले, गाडगे बाबांची दशसूत्री हीच सरपंचांची कर्तव्ये आहेत आणि आपली जबाबदारी ते योग्यरित्या पार पाडत आहेत.
गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर विविध क्षेत्रात कार्य करणा-या शाळा, महाविद्यालये, संस्थांच्या पदाधिका-यांचा याप्रसंगी स्मृतिचिन्ह, शाल देऊन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती पाटील यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भैसने यांनी संत गाडगे बाबांच्या जीवनावरील गीत सादर केले. प्रास्ताविकातून अध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन गौरव इंगळे यांनी, तर आभार सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे यांनी मानले. कार्यक्रमाला विभागाच्या पाचही जिल्ह्रांमधील गावांचे सरपंच, महिला सरपंच, विविध शाळांचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.