राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात ‘रिसर्च मेथोडोलॉजी’वर कार्यशाळा
शिक्षण मनुष्याला परिपूर्ण करते – डॉ राजेंद्र काकडे
नागपूर : शिक्षण मनुष्याला परिपूर्ण करते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे यांनी केले. विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागात ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा रविवार, दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ काकडे बोलत होते.
इंग्रजी विभागाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून माजी विभाग प्रमुख डॉ डी एम शेंडे, हिस्लाॅप महाविद्यालयाचे डॉ प्रांतिक बॅनर्जी व विभाग प्रमुख डॉ संजय पळवेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना शिक्षण ही सर्वांची गरज असल्याचे सांगितले. तुम्ही शिक्षण घेतले नाही तर तुमचा विकास होणार नाही. शिक्षण घेतले तरच विकास होईल अशा शब्दात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणामध्ये संशोधन करताना ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ या विषयाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयाचा सखोल अभ्यास करीत पुन्हा पुन्हा संशोधन करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन त्यांनी संशोधक विद्यार्थ्यांना केले. इंग्रजी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ डी एम शेंडे यांनी मार्गदर्शन करताना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानेच प्रश्नाचे समाधान शोधता येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी विश्व, पृथ्वी, मनुष्यजीवन, निसर्ग याचा कशाप्रकारे सहसंबंध असून याची नियंत्रण कोण करतो. कोणत्या शक्तीद्वारे याचे नियंत्रण होते, असे प्रश्न उपस्थित करीत संशोधकांनी अशा प्रकारे शोध घेण्याचे आवाहन केले.
हिस्लाॅप महाविद्यालयाचे डॉ प्रांतिक बॅनर्जी यांनी ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन करताना संशोधनातील विविध बारकावे समजावून सांगितले. संशोधन करीत असताना ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत संशोधकांनी या विषयाचा आधी अभ्यास करावा असे त्यांनी सांगितले. या विषयातील बारकावे तुम्हाला प्रश्न निर्माण करतील आणि त्यातूनच तुमच्या संशोधनातील निष्कर्ष येतील, असे डॉ बॅनर्जी म्हणाले. प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ संजय पळवेकर यांनी कार्यशाळा आयोजना मागील भूमिका विशद केली. या कार्यशाळेमुळे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करताना मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय मिलिंद सुखदेवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचलन अंशू चौधरी यांनी केले तर आभार अश्विन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.