संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानावर कार्यशाळा संपन्न
अमरावती : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या मार्गदर्शक तत्वावर विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. शासकीय व अनुदानित महाविद्यालयांना अनुदान प्राप्त होण्यासाठी ही कार्यशाळा मैलाचा दगड ठरणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन रुसा कार्यालय, मुंबईचे डॉ. प्रमोद पाब्रोकर यांचे शुभहस्ते व विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली विद्यापीठ अधिसभागृहात संपन्न झाले. डॉ. पाब्रोकर यांनी सर्वप्रथम कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. पुढे माहिती देतांना ते म्हणाले, रुसा – 1 मध्ये महाविद्यालयांना अनुदान मिळाले नाही, त्यामुळे रुसा – 2 मध्ये निवडक शासकीय महाविद्यालयांना अनुदान देण्यात आले आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाची मार्गदर्शक तत्वे प्राचार्यांनी अवगत करावी. कारण ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वाची आहे. अभियान योजनेमध्ये केंद्र शासनाकडून साठ टक्के आणि राज्य शासनाकडून चाळीस टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. उच्च शिक्षणातील जी.ई.आर. वाढविण्याबाबत शासनाचा महत्तम उद्देश आहे. महाविद्यालयांना यामध्ये त्यांच्या नॅकमधील मानांकन सुधारणेला वाव मिळेल. योजनेसाठी केंद्र शासनाने विद्यापीठ परिसरातील अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा या चार जिल्ह्रांना फोकस डिस्ट्रीक्ट म्हणून घोषित केले आहे. कम्पोनन्ट – 3 मध्ये शासकीय व अनुदानित महाविद्यालयांना सक्षमीकरणासाठी पाच कोटी रूपयापर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
त्याकरीता महाविद्यालयांना मार्गदर्शक तत्वाचा अभ्यास करुन अनुरुप प्रस्ताव शासनाकडे पाठवावयाचा आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती डॉ. पाब्रोकनी यावेळी दिली. ज्या महाविद्यालयांनी नॅक केले नाही, अशा महाविद्यालयांनासुद्धा कम्पोनन्ट – 3 मध्ये प्रस्ताव सादर करता येईल. प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट स्थापन करण्यात यावे. याशिवाय संशोधन प्रयोगशाळा उभारणी, जेम पोर्टल, यंत्रसामुग्री, लेखे आदींची माहिती सविस्तरपणे त्यांनी याप्रसंगी दिली. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी सांगितले, मुख्यत्वेकरुन उच्च शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य देण्याकरीता शासनाची नवीन योजना आहे. त्याकरीता असलेले क्रायटेरिया आणि घटक महाविद्यालयांच्या मानांकनाकरीता महत्वाची असून या योजनेची व्याप्ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी जोडलेली आहे.
कार्यशाळेचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व आभार विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी मानले. कार्यशाळेला विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक मोठ¬ा संंख्येने उपस्थित होते.