शिवाजी विद्यापीठात प्रधानमंत्री मुद्रा योजना या विषयावरील कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : जागतिक स्तरावर भारत हा लोकसंख्येच्या बाबतीतप्रथम क्रमांकावर आहे. शिवाय भारत हा तरुणांचा देश आहे. तरुण पिढीला स्वयं रोजगरासह उद्योजक बनविण्यासाठी शासकीय स्तरावर विविध योजना, धोरणे व कार्यक्रम योजले जातात. तरुणांना ‘सूक्ष्म व लघु’ स्तरावर उद्योजक होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक नव-संजीवनी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी केले. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रभावाचे मूल्यांकन: पश्चिम महाराष्ट्रातील अंतरदृष्टी’ या विषयावरील कार्यशाळेमध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र-संचालक डॉ. नितीन माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरग्रामीण स्‍वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुलभूषण उपाध्ये उपस्थित होते.

यावेळी गोडसे म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागात उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना एक महत्वाची योजना आहे. यामध्ये लाभार्थीना  विनातारण कमाल दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. यामुळे वित्तीय समावेशन होऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी निर्माण होतात. कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान मुद्रा योजनेचे आज तागायत 55 हजार लाभार्थी असून साधारणतः 550 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. एका अर्थाने ही योजना म्हणजेच उद्योजक निर्माण करणारी योजना असल्याचे गोडसे यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत मागील सात वर्षामध्ये 10 हजार रुपयांचे कर्ज घेऊन सुरू केलेल्या उद्योगांनी आज कोटींच्या वरती उलाढाल केली आहे. त्यामुळे सूक्ष्म व लघु स्तरावरील प्राथमिक अवस्थेत ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे, परंतु भांडवलाची कमतरता आहे अशा सर्वांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. गोडसे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ डेव्हलपमेंटमध्ये वित्तीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाचे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्व त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. माळी यांनी वित्तीय समावेशकता कार्यक्रमामध्येप्रधानमंत्री मुद्रा योजनेची भूमिका स्पष्ट केली. चालू काळात तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता एक यशस्वी तरुण उद्योजक व्हावे. याकरिता मुद्रा योजना ही एक वित्त पुरवठयाची आधारभूत पायरी आहे. स्वयंरोजगारासह समाजातील गरजू लोकांना रोजगार देण्याची क्षमता तरुणांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ डेव्हलपमेंटमध्ये ग्रामीण विकासाच्या दृष्टीने वित्तीय क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची तपशीलवार मांडणी डॉ. माळी यांनी यावेळी केली.

Advertisement

कोल्हापूर ग्रामीण स्‍वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे (आरशेती) संचालक कुलभूषण उपाध्ये यांनी आरशेती संस्थेकडून चालविले जाणारे उपक्रम, व्यवसायासाठीचे शिक्षण- प्रशिक्षण, उद्योजक क्षेत्रातील संधी व आव्हाने यावर मार्गदर्शन केले. संशोधन प्रकल्प समन्वयिका व सहायक प्राध्यापिका डॉ. कविता वड्राळे यांनी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रभावाचे मूल्यांकन: पश्चिम महाराष्ट्रातील अंतरदृष्टी’ या विषयाच्या अनुषंगाने पूर्ण केलेल्या संशोधनाची मांडणी केली. यामध्ये मुद्रा योजनेची पार्श्वभूमी, राष्ट्रीय स्तरावरील मुद्रा योजनेचा आढावा, पश्चिम महाराष्ट्रातील मुद्रा योजनेची सद्य स्थिती, मुद्रा योजनेमुळे लाभार्थीच्या  सामाजिक-आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम व निवडक यशस्वी उद्योगगाथा यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पोरलेकर व संध्या कांबळे यांनी केले तर आभार डॉ. उमेश गडेकर यांनी मानले. यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभार्थी, शासकीय व निम शासकीय स्थरावरील कर्मचारी, आशा वर्कर, स्वयम् सहायता गटाचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, माध्यम प्रतिनिधी व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page