एमजीएममध्ये ‘कौटुंबिक कायदे’ विषयावर कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च’च्या वतीने आयोजित ‘कौटुंबिक कायदे’ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यशाळेत उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ॲड .एस. एस. केरे यांनी ‘कौटुंबिक कायदे’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत ॲड. एस. एस. केरे यांनी विद्यार्थ्यांना घटस्फोट, घटस्फोटाची नोटीस, घटस्फोट याचिका दाखल करणे, घटस्फोट संदर्भातील व्यावहारिक पैलू व संबंधित विषयाबद्दल सविस्तरपणे माहिती सांगितली.
एलएलबीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक न्यायालयाशी संबंधित प्रकरणांसाठी मसुदा तयार करणे आणि या संदर्भातील केस दाखल करीत असताना लागणारे कौशल्य विकसित करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका डॉ. झरताब अंसारी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कल्पना हिने करून दिला. कार्यक्रमाचे आभार ॲड उमेश रुपारेल यांनी मानले. यावेळी प्रा. रिना मानधनी, प्रा. सय्यद रहीमुद्दीन, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.