नागपूर विद्यापीठात ‘युवांसाठी उद्योजकतेचा प्रवास’ विषयावर तीन दिवसीय प्रबोधन कार्यशाळा ४ फेब्रुवारीपासून
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-UShA) अंतर्गत युवांसाठी उद्योजकतेच्या प्रवास’ या विषयावर ४ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तीन दिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), अर्थशास्त्र विभाग, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (VIA) आणि इनफेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेचे आयोजन औषधी निर्माण शास्त्र विभागातील डॉ ए के डोरले सभागृह येथे करण्यात आले आहे.

प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या संयोजिका आयक्यूएसी संचालक डॉ स्मिता आचार्य आहेत. मंगळवार दि ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन प्लास्टो ग्रुप संचालक व VIA अध्यक्ष विशाल अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. बुधवार दि ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता समारोप समारंभासाठी प्रख्यात उद्योजिका व विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अध्यक्ष रीना सिन्हा याची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
विद्यार्थ्यांना युवांसाठी उद्योजकतेच्या प्रवासात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन कार्यशाळेच्या संयोजिका डॉ स्मिता आचार्य यांनी केले आहे. त्यांनी उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी नसून समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि वाढीची मानसिकता विकसित करण्यास मदत करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे आणि नवीन नवकल्पना आत्मसात कराव्यात, असे त्यांनी सांगितले. योग्य दिशा, धोरणे आणि प्रेरणा मिळवून आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. तसेच, भविष्यातील नेते आणि परिवर्तन घडवणारे उद्योजक म्हणून समाजात आपला ठसा उमटवण्यासाठी ही संधी विद्यार्थ्यांनी साधावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ एस एच इंदूरवाडे यांनी सांगितले की, ही कार्यशाळा विशेषतः अतंत्रिक (नॉन-टेक्निकल) पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. त्यांना उद्योजकतेची मूलभूत समज आणि संधींची ओळख व्हावी हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. अर्थशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका आणि कार्यशाळेच्या समन्वयक, डॉ अपर्णा समुद्र यांनी सांगितले की, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, थेट अनुभव आणि मार्गदर्शन संधी उपलब्ध करून देईल. या कार्यशाळेत अनेक प्रख्यात उद्योजक व प्रशिक्षक मार्गदर्शन करणार असून, ते सहभागींना उद्योजकतेच्या विविध पैलूंवर प्रशिक्षण देतील आणि व्यावसायिक मानसिकता विकसित करण्यात मदत करतील.
“विकसित भारत @ २०४७” च्या उद्दिष्टपूर्तीसाठी युवकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आवश्यक आहे,” असे नमूद करत डॉ अपर्णा समुद्र यांनी सांगितले की, जेव्हा युवक नोकरी शोधणारे न राहता नोकरी निर्माण करणारे बनतील, तेव्हा समाजातील समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती साध्य होईल आणि विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास घडवता येईल.