गोंडवाना विद्यापीठात इंग्रजी पदव्युत्तर विभागाची कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर विस्तृत मार्गदर्शन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील इंग्रजी पदव्युत्तर शैक्षणिक विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. इंग्रजी विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रभावीपणे राबवितांना विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठीत शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे, विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रकल्प कार्य देणे तसेच अभ्यासक्रम रोजगाराभिमुख कसा करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ अक्षय धोटे, सदस्य डॉ अस्लम शेख, इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ विवेक जोशी, समन्वयक डाॅ प्रमोद जावरे, प्रा डॉ वैभव मसराम, डॉ अतुल गावस्कर, विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम, विद्यार्थ्यांना कौशल्यपुर्ण प्रशिक्षण देवून रोजगारक्षम करण्याकरीता कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.
मार्गदर्शन करताना अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ अक्षय धोटे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित कार्य कसे प्रभावी करता येईल याबाबत संक्षिप्त माहिती देत मार्गदर्शन केले.
अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ असलम शेख यांनी शैक्षणिक तृतीय व चतुर्थ सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रकल्प कार्याची विस्तृत माहिती दिली. तसेच प्रकल्प कार्याला अधिकाधिक प्रभावी करून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला कौशल्य आधारित करण्याकरता मार्गदर्शन केले.
याअनुषंगाने, चार सत्रात पार पडलेल्या इंग्रजी पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या कौशल्य व संशोधनावर आधारित अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सदर कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यशाळेप्रसंगी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्न उपस्थित करून उपस्थित तज्ञ मार्गदर्शकांकडून माहिती प्राप्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विवेक जोशी यांनी केले. संचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ अतुल गावस्कर तर उपस्थितांचे आभार डॉ वैभव मसराम यांनी मानले.