शिवाजी विद्यापीठात महिला सन्मान परिषद संपन्न
महिला हिंसाचाराच्या विरोधात नागरिकांनी भूमिका घ्यावी – ऍड रमा सरोदे
कोल्हापूर : महिलांना संरक्षण मिळावे म्हणून अनेक कायदे केले असले तरी समाजाचा सक्रीय सहभाग नसेल तर कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होणार नाही. महिलांवर अत्याचार करणार्यांच्या विरोधात कायदा आपले काम करेलच; पण नागरिकांनही सजग राहून हिंसाचाराच्या विरोधात ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे प्रतिपादन पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड रमा सरोदे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वि स खांडेकर भाषा भवन येथे आयोजित स्त्री सन्मान परिषदेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पुणे येथील स्त्री प्रश्नांचे अभ्यासक मिलींद चव्हाण, मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव, अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड अभिषेक मिठारी, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे आदी उपस्थित होते.
‘लैंगिक हिंसा, कायदा आणि आपली जबाबदारी’ या विषयावर अॅड सरोदे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, महिलांच्या विरोधात अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतरच कठोर कायदा करण्यासंदर्भात विचार सुरु होते. गेल्या काही काळात महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अत्याचार करणार्यांना फाशी द्या, अशी मागणी जोराने होत आहे. फाशीच्या शिक्षेबाबत अनेक मतप्रवाह आहेत. तथापि, हिंसाचाराची घटना घडल्यानंतर तातडीने शिक्षा व्हायला हवी. यामध्ये कालापव्य होता कामा नये, असा लोकांचा आग्रह असला पाहिजे. गुन्हेगाराला तातडीने शिक्षा होते असा संदेश गेल्यास गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
स्त्री प्रश्नाचे अभ्यासक मिलींद चव्हाण म्हणाले, साम्राज्यवादी व्यवस्था आणि युद्धजन्य स्थितीत महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाल्याचे इतिहास सांगतो. भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळीही महिलांवर खूप अत्याचार झाले. जातपितृसत्ताक व्यवस्थेत पहिला बळी महिलेचाच जातो. महिलांचे वस्तूकरण होत असून अगदी लहान मुलींवरही अत्याचार होताना दिसत आहेत. वंशवाद, जातीयवाद, धर्मवाद, वर्णवर्चस्ववाद या सगळ्या व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात. या व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत आणि समाज म्हणून आपण महिलांप्रती आदरभाव जोपासला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दोन्हीही मान्यवरांनी सविस्तर उत्तरे दिली.
स्वागत व प्रस्ताविक डॉ शिवाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचालन जयप्रकाश पाटील यांनी केले. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ नंदकुमार मोरे, कृष्णात स्वाती, डॉ अरुण शिंदे, डॉ अनमोल कोठाडीया, डॉ सुमेधा साळुंखे यांच्यासह विविध महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.