राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला अध्ययन आणि विकास केंद्रात महिला दिन साजरा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला अध्ययन आणि विकास केंद्रात “महिला दिन” आणि “सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी” चे औचित्य साधून व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर एस मुंडले महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ मंजू दुबे यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थान केंद्र संचालिका डॉ मंगला हिरवडे यांनी भूषविले.

महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलानी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या अधिकारप्रती जागृत होणे गरजेचे असल्याचे मत डॉ मंजू दुबे यांनी व्यक्त केले. महिलांचे हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण करण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनीही एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे डॉ दुबे म्हणाल्या. केंद्र संचालिका डॉ मंगला हिरवडे यांनी अध्यक्षीय भाषणात “आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२५ ची थीम, “सर्व महिला आणि मुलींसाठी: हक्क, समानता, सक्षमीकरण,” ही जागतिक स्तरावर लिंगभाव समानता साध्य करीत महिला आणि मुलींना सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महिला दिन याविषयावर आपली मते आणि कविता सादर केल्या.
या वेळी विभागातील प्राध्यापिका डॉ प्रिती उमरेडकर, डॉ रश्मी चंदावार, डॉ सुजय कालबांधे, डॉ रायन महाजन आणि डॉ नितीन कायरकर तसेच इतर शिक्षकेत्तर कर्मचारी लीना लांडे, भुपाली उपरीकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुलभा राऊत यांनी केले तर आभार वामन राऊत यांनी मानले.