प्रत्येक महिला सक्षम असून ती सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडते – पारोमिता गोस्वामी
एमजीएम सक्षमा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना प्रदान
छत्रपती संभाजीनगर : आदिवासी महिला ते अमेरिकेत काम करणाऱ्या महिलेपर्यंत आज सगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व महिला या सक्षम आहेत. महिला शिस्तप्रिय, सर्जनशील, प्रामाणिक या गुणांसह आपल्या कामाला न्याय देत त्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी केले. दरवर्षी महात्मा गांधी मिशन, एमजीएम विद्यापीठ व एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा ‘सक्षमा’ सन्मानाने गौरव केला जातो. रुक्मिणी सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात २०२४ या वर्षीचा ‘सक्षमा’ पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
यावेळी बोलताना पारोमिता गोस्वामी म्हणल्या, मी सुरक्षित वातावरणात राहत होते. पदवी झाल्यास मला जाणवले की, आपल्याला देशाबद्दल, शेतकरी वर्गाबद्दल आणि ग्रामीण भागाविषयी काहीच माहिती नाही. मी कधी शेतकरी आणि इतर वर्गाला कधी बोलले अथवा भेटले नव्हते. मला असे वाटले की, आपण असे स्वत: अलिप्त राहिलो तर आपल्याला आपला देश कधीच कळणार नाही. म्हणून मग मी निर्णय घेतला की, आपण अशा क्षेत्रात काम करायला हवं ज्या माध्यमातून आपल्याला आपला देश समजू शकेल. आपला देश शेतीप्रधान असून हे सगळं कळले पाहिजे म्हणून मी सामाजिक क्षेत्रात आले.
सन १९९९ मध्ये मी चंद्रपूर येथे आले आणि युनिसेफच्या प्रायमरी एज्युकेशन इनहॅन्समेंट या उपक्रमात मी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयक म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाशी माझा जवळून संबंध आला असून मी चंद्रपूरची ‘जेल व्हिझिटर’ म्हणून काही काळ काम केलेले आहे. या कामाच्या माध्यमातून श्रमिक एल्गार संघटनेची स्थापना झाली. आज संघटनेत ३० हजारांहून अधिक सदस्य काम करीत असून या भागात महिला नेतृत्व तयार झाले आहे. या महिलांनी दारूबंदीसंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असल्याचे पारोमिता गोस्वामी यांनी यावेळी सांगितले.
पारोमिता गोस्वामी पुढे बोलताना म्हणाल्या, लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळायला हवा, जंगलावरील आदिवासींचा अधिकार याबाबत आम्ही काम करीत होतोत. मात्र, कुठेही लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले की, लोकं एकच प्रश्न उपस्थित करीत असत की, हे सगळं करून काय फायदा होणार आहे? आमच्या घरी कितीही पैसे आले तर ते सगळे पैसे दारूमध्येच जाणार असल्यामुळे तुम्ही आधी तुम्ही दारू बंद करा. दारूबंदी करण्यासाठी महिलांच्या पुढाकाराने आम्ही २००१ पासून आंदोलन करण्यास सुरूवात केली. दारूबंदीमुळे गावाचे पूर्ण वातावरणात बिघडलेले असते. लहान मुलांचे दारू पिणे, मुलींना त्रास, शिक्षणाचा प्रश्न, अपघात अशा अनेक प्रश्नांसह या भागातील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
दारूबंदी साठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत होतोत. आमच्या व्यथा मांडण्यासाठी आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही मुंडन करण्याचा निर्णय घेतला. आणि दारूमुळे आम्ही महिला विद्रूप दिसू मात्र, दारूमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र विद्रूप झालेला आहे. या भावनेतून आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही सर्व महिलांनी मुंडन करून आमची कळकळ मांडण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामध्ये आम्हां सर्व आंदोलन करणाऱ्या महिलांना यश मिळाले आणि चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी झाली. एमजीएमने माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मला ‘सक्षमा पुरस्कार’ दिला याबद्दल एमजीएम परिवाराचे मनापासून आभार मानते. माझी जन्मभूमी जरी कोलकाता असली तरी माझी कर्मभूमि चंद्रपूर आहे. मी करीत असलेल्या सामाजिक कार्यामध्ये मला माझ्या कुटुंबियांचे कायम सहकार्य राहिलेले आहे. एमजीएम नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित आले असून आपल्या अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमास माझ्याकडून शुभेच्छा आहेत, असे पारोमिता गोस्वामी यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना शशिकला बोराडे व अनुराधा कदम यांच्या हस्ते आणि अपर्णा कक्कड, डॉ. प्राप्ती देशमुख, प्रा. डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, टिना सहरान व प्रा. विजया मुसांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सक्षमा’ पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते एमजीएम गवाक्ष आणि महिला दिन विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. तसेच यावेळी प्रा. डॉ. आशा देशपांडे आणि प्रा. शामल इंगळे यांनी सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांची प्रकट मुलाखत घेतली.
आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय मात्र, हा दिन महिलांसाठी रोजच असायला हवा. एमजीएमने सक्षमा पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली असून पारोमिता गोस्वामी यांचे सामाजिक कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक असल्याचे श्रीमती शशिकला बोराडे यांनी यावेळी सांगितले.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सक्षमा ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. प्राप्ती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशा देशपांडे यांनी तर आभार प्रेरणा दळवी यांनी मानले.
महात्मा गांधी मिशन ‘सक्षमा’ पुरस्कार स्वरूप :
महात्मा गांधी मिशन ‘सक्षमा’ पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व ५० हजार रोख रक्कम देऊन पुरस्कारार्थीला सन्मानित करण्यात येते.