मुक्त विद्यापीठाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणार – कुलगुरू संजीव सोनवणे
आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व विषयी
कर्नल ब्रम्हासिंग – कर्नल प्रमोद नयनन यांचे व्याख्यान संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) : आगामी काळात लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात व मॉक ड्रील देखील घेण्यात येईल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. विद्यापीठाच्या ग्रामीण विकास आणि उद्योजकता विद्याशाखातर्फे ‘आपत्ती व्यवस्थापनाचे महत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जगुआर अकादमीचे कर्नल ब्रम्हासिंग व कर्नल प्रमोद नयनन यांनी संयुक्तरीत्या पीपीटी सादरीकारणासह हे व्याख्यान दिले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले यांची विशेष उपस्थिती होती.

आपल्या व्याख्यानात बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे पुढे म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्या सोबत त्याची प्रसंगानुसार त्याची अंमलबजावणी देखील महत्वाची आहे. जगुआर अकादमीचे कर्नल ब्रम्हासिंग व कर्नल प्रमोद नयनन यांनी आपल्या व्याख्यानात बोलतांना सांगितले की भूकंप, महापुर, चक्रीवादळ, त्सुनामी, ज्वालामुखी, वनवा पेटणे आदी आपत्ती या नैसर्गिक आहेत तर युद्ध, दंगली, वायुगळती, विविध रोगांच्या साथी, नद्या – सागरसहित एकूण पृथ्वीवरील सर्व प्रकारचे प्रदूषण या मानवनिर्मित आपत्ती आहेत. दुर्दैवाने मानवनिर्मित आपत्तींची संख्या व दुष्परिणाम वाढीस लागत आहेत. काही नैसर्गिक आपत्तींना मानवच जबाबदार ठरत आहेत. एखाद्या आपत्तीने जेवढे नुकसान होते तेवढेच नुकसान अशा आपत्तींविषयी जागरूकता व पूर्वतयारी नसल्यामुळे होत असते. कुणा एका जणाची चूक – दुर्लक्ष किंवा बेफिकिरीमुळे भोपाळ गॅस किंवा ‘टायटॅनिक’ सारखी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आपत्ती टाळण्यासाठी प्रत्येक छोट्या मोठ्या व्यक्तीने सजग असले पाहिजे. वैयक्तिक व संस्थात्मक आपत्ती व्यवस्थापन व निवारण आराखडा असला पाहिजे, पूर्वतयारी व मानसिकता असली पाहिजे, तसे तज्ज्ञ व मार्गदर्शक व्यक्तींचे पथक, त्यांचा सराव असला पाहिजे यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला. यावेळी त्यांनी गुजरात भूकंप, तुस्नामी, केदारनाथ आदी आपत्तींविषयी ध्वनिचित्रफिती दाखवून मार्गदर्शन केले. बेसुमार जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, रासायनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न होणे, बहुसंख्य नद्यांचा कचरा डेपो होणे याकडे देखील त्यांनी आपल्या व्याख्यानात लक्ष वेधले.
प्रास्ताविक कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रामीण विकास आणि उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विविध विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते