अमरावती विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप
चुरशीच्या लढतीत भारती विद्यापीठ पुणे संघाने मारली बाजी
डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सवी
अमरावती : मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत भारती विद्यापीठ पुणे संघाने पहिले स्थान प्राप्त केले. शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचा समारोप श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर थाटात संपन्न झाला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या पारितोषिक समारंभाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंत काळमेघ, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, प्राचार्य डॉ अमोल महल्ले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ नितीन चांगोले, डॉ भैय्यासाहेब मेटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर विचारपीठावर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्र संचालक तनुजा राऊत, प्राचार्य डॉ ए एल कुलट, स्पर्धा संयोजक डॉ सुभाष गावंडे उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत डॉ किशोर साबळे, डॉ उमेश कडू, डॉ खुशाल अळसपुरे, संदीप इंगोले, डॉ उल्हास देशमुख, डॉ श्रीकांत माहुलकर, डॉ विक्रांत वानखडे, डॉ कविता गावंडे, डॉ रुपाली टोणे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन डॉ मनोज जोशी यांनी केले तर डॉ सुभाष गावंडे यांनी आभार मानले.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या प्रेक्षक गॅलरीसह संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. सर्वांना उत्सुकता होती या स्पर्धेत कोणता संघ बाजी मारेल याची. भारती विद्यापीठ पुणे संघाने आपल्या दमदार आणि शानदार खेळाच्या भरोशावर कोटा विद्यापीठ राजस्थान संघाचा ३३ विरुद्ध ३१ असा दोन गुणांनी पराभव करत या स्पर्धेत पहिले स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानावर कोटा विद्यापीठ राजस्थान संघाला समाधान मानावे लागले.
भारती विद्यापीठ संघातर्फे निकिता पडवळ हिची उत्कृष्ट पकड तर निकिता मांगलेकर हिच्या उत्कृष्ट चढाईच्या भरोशावर भारती विद्यापीठाने विजयश्री खेचून आणली. अतिशय अटीतटीच्या या सामन्यात पुणे संघासोबत कोटा संघाने ने पण पहिल्यापासून आक्रमक धोरण स्वीकारले होते. मध्यंतरापर्यंत पुणे संघ केवळ एक गुणाने आघाडीवर होता. क्षणोक्षणी विजयाचे पारडे एक दुसऱ्या संघाकडे झुकत होते. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला पुणे संघ अखेर विजयी ठरला. कोटा संघातर्फे सरिता आणि कल्पना यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघाने अत्यंत खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन या सामन्यात केल्याने प्रेक्षकांनी दोन्ही संघांना चांगली दाद दिली. या स्पर्धेचे तिसरे स्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तर चवथे स्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संघाने प्राप्त केले.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले. या साखळी सामन्यात सर्व सामने जिंकत भारतीय विद्यापीठ संघ पुणे हा संघ अव्वल स्थानी राहिला. कोटा विद्यापीठ राजस्थान संघाने दोन सामने जिंकत दुसरे स्थान प्राप्त केले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने एक सामना जिंकत तिसरे स्थान प्राप्त केले. एस आर टी एम नांदेड संघाला एकही सामना जिंकता आला नाही आणि या संघाला चौथे स्थान प्राप्त झाले. हे चारही संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे कार्याध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट स्पर्धा संयोजक तथा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ सुभाष गावंडे यांच्या मार्गदर्शनात श्री शिवाजी शिक्षण संस्था व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालकांनी सहकार्य केले.
शेवटच्या झालेल्या सामन्याचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
भारती विद्यापीठ पुणे मात एस आर टी एम नांदेड ५८ विरुद्ध २०.
कोटा विद्यापीठ राजस्थान मात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ४१ विरुद्ध १६.
भारतीय विद्यापीठ पुणे संघ मात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ४५ विरुद्ध १९.
कोटा विद्यापीठ राजस्थान एस आर टी एम विद्यापीठ नांदेड ४७ विरुद्ध १३.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मात एस आर टी एम विद्यापीठ नांदेड मात ४३ विरुद्ध २२.