अमरावती विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) क्रीडा स्पर्धेचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन

ढोलताशाच्या निनादात, फटक्याच्या आतिषबाजीत क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

अमरावती : ढोलताशाच्या निनादात, फटक्याच्या आतिषबाजीत आणि आकाशभर उडालेल्या रंगबिरंगी फुग्याच्या रंगारंग वातावरणात आज सायंकाळी साडेसहा वाजता पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कब्बडी (महिला) क्रीडा स्पर्धेचे क्रीडा ज्योत पेटवून उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनाची घोषणा केली तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी अध्यक्षीय संबोधन केले.

शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने दि २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) क्रीडा स्पर्धा श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य क्रीडागणावर उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृहात हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला.

Advertisement

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर कार्याध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ रवींद्र कडू व डॉ प्रवीण रघुवंशी, भैय्यासाहेब मेटकर, डॉ नितीन चांगोले, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजाननराव पुंडकर व अॅड जे व्ही पाटील पुसदेकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य सुरेशराव खोटरे व प्रा सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील व संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ वि गो ठाकरे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ तनुजा राऊत, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट, आयोजन समितीचे संयोजक डॉ सुभाष गावंडे विचारपीठावर उपस्थित होते.

सोहळ्याचे अध्यक्ष कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, उद्घाटक हर्षवर्धन देशमुख, संजीता मोहपात्रा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ तनुजा राऊत यांनी केले तर प्राचार्य डॉ अंबादास कुलट यांनी स्वागतपर भाषण केले. तर कार्याध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी आपल्या भाषणातून आयोजकांची भूमिका मांडली.

श्रुती प्रकाश बडेरे हिने खेळाडूंना शपथ दिली. डॉ सुभाष गावंडे, डॉ कुमार बोबडे, डॉ उदय ठाकरे, डॉ अर्चना बोबडे, डॉ वर्ष चिखले, डॉ महेंद्र मेटे, डॉ सुजाता सबाने, डॉ सुवर्णा गाडगे, डॉ राजेश मिरगे, डॉ ज्ञानेश्वर नामुर्ते, प्रा सीमा मेटकर, नीता देशमुख यांनी पाहुण्यांचे शाल, स्मृतीचिन्ह व रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ मनोज जोशी यांनी केले तर संयोजक डॉ सुभाष गावंडे यांनी आभार मानले.

उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे आजीव सदस्य, सर्व शाळा – महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या संगीत विभागाने डॉ गजानन केतकर यांच्या नेतृत्त्वात विद्यापीठ गीत व गौरव गीत सादर केले. तर रुद्रावतार ढोलताशा पथकाने उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page