उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना प्रजासत्ताक दिन निवड शिबिर सुरू

जळगाव : भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, पुण्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात १२ नोव्हेंबरपासून पश्चिम विभागीय राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १० दिवस चालणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, दमन, दादरा-नगर हवेली आणि गोवा या सात राज्यांतील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी अशा २०० रासेयो स्वयंसेवकांचा सहभाग असेल.

Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon
KBCNMU

शिबिराचे उद्‌घाटन मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता उत्तराखंड राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ रणजित कुमार सिन्हा यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी असतील. यावेळी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे आणि महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ निलेश पाठक देखील उपस्थित असतील.

शिबिराच्या दरम्यान, स्वयंसेवकांसाठी पथसंचलनाचा सराव सकाळी ९ ते ११:३० व दुपारी ३ ते ५:३० या वेळेत होईल. सकाळी योग, दुपारी गट चर्चा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशी शिबिराची दिनचर्या असेल. या शिबिरातून दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी ५६ विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

या शिबिरासाठी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालक अजय शिंदे, कुलसचिव डॉ विनोद पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com