स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आज उद्घाटन
८ क्रीडांगणावर रात्री १० वाजेपर्यंत प्रकाश झोतात खेळणार स्पर्धक
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि. १४ डिसेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड गुरुद्वारा लंगरचे बाबा बलविंदरसिंघजी, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, पॅरा ऑलिंम्पिक अॅथेलेटिक्स खेळाडू भाग्यश्री जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच अंजली पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या पाच राज्यातील ११४ टीमसह १६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. एकूण ८ क्रीडांगणावर या स्पर्धा होणार आहेत. त्यामधील ६ या आऊट डोअर मैदानावर तर २ इनडोअर मैदानावर होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा सकाळी ७:०० वा. सुरू होऊन रात्री १०:०० वाजेपर्यंत चालणार आहेत. या सर्व स्पर्धा प्रकाश झोतात खेळविल्या जाणार आहेत. या सर्व टीम सोबत २२८ संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या खेळा दरम्यान निर्णय घेण्यासाठी पंच व तांत्रिक समित्यांमध्ये जवळपास ७० तज्ञांची नेमणूक केलेली आहे. यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दोन वेळा पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्यांदा विद्यापीठाला सदर क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा बहुमान मिळाला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, स्पर्धा समन्वयक डॉ. अंकुश पाटील, पंचप्रमुख पी. एस. पंथ, मैदान प्रमुख डॉ. विक्रम कुंटूरवार, मुख्याध्यापक गच्चे सर इत्यादी परिश्रम घेत आहेत.