राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन
दिंडी चालली चालली…
शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण आवश्यक – प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे
नागपूर : दिंडी चालली चालली… यासह सुमधुर भजनांच्या निनादात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाराज बाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांची उपस्थिती होती. आजपर्यंत आपण अनेक दिंडी बघितल्या. मात्र, अशा प्रकारची वृक्षदिंडी प्रथमच बघितली आणि अनुभवली असेल.






या दिंडीत सहभागी होत याचे महत्त्व आपणास कळले असेल, अशा कुलगुरू पुढे बोलताना म्हणाल्या. जन्म देत बाळाचे ज्याप्रमाणे आई संगोपन करते. आईचे संस्कार आपले व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व ठरवितात. जीवन जगताना आई हीच आपली प्रथम गुरु असते. त्यानंतर शिक्षक हे आपले द्वितीय गुरू असतात. शिक्षणातून कर्तृत्व निर्माण होते. त्यामुळे विद्यापीठ देखील आईप्रमाणेच आहे. आई सोडून गेल्यानंतर तिचे महत्त्व आपणास कळते, तिची आठवण येते. त्याचप्रमाणे झाड लावणे म्हणजे निसर्गाचे चक्र पुन्हा नव्याने सुरू करणे होय.
वृक्ष देखील जन्मापासून मृत्यूपर्यंत आपणास मदत करतात. आई आणि वृक्षाची तुलना करून ‘आईच्या नावे एक झाड’ हा उपक्रम आपण राबवित आहोत. आईची आठवण सतत कायम राहावी म्हणून सर्वांनी या उपक्रमात सहभागी होत वृक्षारोपण करण्याचे आवाहन कुलगुरूंनी केले. मातृत्व ही भावना केवळ जन्म देणे एवढीच नाही. झाड लावत त्याचे संगोपन करीत मातृत्वाची भावना जपता येते. ‘एक झाड आईच्या नावे’ हा उपक्रम सुरू केल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्य सरकारचे कुलगुरूंनी आभार मानले. रासेयो स्वयंसेवकांनी गावागावात हा उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल ॲप बाबत त्यांनी माहिती दिली. विद्यार्थी अर्थ सहाय्य, वैद्यकीय मदत, कमवा व शिका आदी विविध प्रकारच्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे रोजगार, प्रशिक्षण व इंटर्नशिपच्या संधी विषयी या ॲपवर माहिती उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी विकास-रोजगार संधीचा लाभ घेत मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले. उच्च शिक्षण घेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, असे कुलगुरू म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी ‘एक झाड आईच्या नावे’ अभियानाची माहिती दिली. येथे आयोजित कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात असून स्वयंसेवकांना प्रत्येक महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आईची आठवण म्हणून एक लावण्याबाबत योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाला स्वयंसेवक संख्या वाढवून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार श्री प्रकाश शुक्ला यांनी मानले.
दीक्षांत सभागृह परिसरात वृक्षारोपण
दीक्षांत सभागृह परिसरात माननीय कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विविध महाविद्यालयांचे कार्यक्रम अधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.
दिंडीने दुमदुमला परिसर
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातून वृक्षदिंडीस सुरुवात झाली. सीताबर्डी चौक, झिरो माईल, शासकीय समाज विज्ञान संस्था या मार्गाने वृक्षदिंडीचा समारोप दीक्षांत सभागृहात करण्यात आला. या वृक्षदिंडीत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते.
