संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
तर विद्यापीठाचे देशात नाव होईल – पद्मश्री शंकरबाबा पापळकर
एेंशी टक्केपेक्षा अधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न करा – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
प्रत्येकाने आपापल्या परिसरात मतदानासाठी जागृती करावी – मनपा आयुक्त देविदास पवार
अमरावती : ‘कल मैं तेरी जुल्फें भी सुलझा दुंगा, मगर अब मैं उलझा हूँ वक्त को सुलझाने में…’अशा ओळी सादर करीत जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, मला जो सन्मान मिळाला, तो आपल्या अमरावती करांचाच आहे, एेंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे देशात नाव होईल, असा आशावाद पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाच्यावतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव मंगेश वरखेडे, मनपा आयुक्त देविदास पवार, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, सामाजिक कार्यकर्ते हुजेफ गोरावाला, विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. जागृत रहा, मतदान करा असा संदेश त्यांनी याप्रसंगी दिला.
कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले, अमरावती शहर प्रत्येकच क्षेत्रात अग्रेसर आहे. सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान, अवयवदान अशा सर्वच क्षेत्रात हे शहर अग्रस्थानी आहे, त्यामुळे मतदानातही अमरावती शहर निश्चितच अग्रेसर राहील असे सांगून एेंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, आपण स्वत: व इतरांनाही त्यासाठी प्रेरीत करावे, कोणत्याही प्रभावाला बळी न पडता प्रत्येकाने मतदान करावे, विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात मतदानासाठी जनजागृती करावी, आपले मित्र, विद्यार्थीनींनी आपल्या मैत्रीणी, नातेवाईक, शेजारी अशा सर्वांना मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन कुलगुरूंनी याप्रसंगी केले.
मनपा आयुक्त देविदास पवार म्हणाले, प्रत्येकाने आपापल्या परिसरात मतदान जनजागृती करावी. मतदानासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरुन अमरावती शहरात सर्वाधिक मतदानाची नोंद होईल. याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विद्यापीठ कर्मचारी संघाचे महासचिव नरेंद्र घाटोळ यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.