देवगिरी महाविद्यालयात मतदान जनजागृती व्याख्यान संपन्न

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या निर्देशाने प्रो डॉ श्याम कदम यांचे मतदान जागृतीपर व्याख्यान देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे  दि २०/०४/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ अशोक तेजनकर उपस्थित होते. तर प्रमुख व्याख्याते  प्रा डॉ श्याम कदम (राज्यशास्त्र विभागप्रमुख, देवगिरी महाविद्यालय) होते.

त्यांनी मार्गदर्शन करत असताना राज्यघटनेने प्रत्येक भारतीयांना ‘एक व्यक्ती एक मतदान’ करण्याचा अधिकार दिला आहे. तो सर्वांनी बजावला पाहिजे. भारतात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामध्ये लोकशाहीचे चित्र बदलण्याची शक्ती आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान करावे व इतरांनाही प्रवृत्त करावे. भारताला लोकशाहीचा वारसा सहजासहजी मिळालेला नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. भारतात जन्मलेल्या प्रत्येकाला जन्मापासूनच नागरिकत्व प्राप्त होते मात्र जगातील काही राष्ट्रात आजही नागरिकत्व सहजासहजी मिळत नाही. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकला वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळतो हि एक मोठी क्रांती आहे असे ते म्हणाले. याबरोबरच ‘एक व्यक्ती एक मत’ हि संकल्पना भारतीय संविधानाने दिलेली अमूल्य देणगी आहे. यामुळे व्यक्ती- व्यक्तीमध्ये भेदभाव केला जात नाही. सर्वांच्या मताचे मूल्य सारखेच असते. मतदान केल्याने व्यवस्था परिवर्तन होते एका मतानेही सरकार बदलू शकते यासाठी सर्वांनी मतदान करावे असे त्यांनी सांगितले.  

Advertisement

अध्यक्षीय समारोप करत असताना देवगिरी महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा डॉ अशोक तेजनकर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या मताला किंमत आहे म्हणून त्यांची कामे होतात. मतदान करणारांच्या विचाराचे शासन सत्तेवर येत असते. म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून मतदान केले पाहिजे असे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालाचे उपप्राचार्य प्रा दिलीप खैरनार यांनी केले. ते म्हणाले की, मतदानाची टक्केवारी खूप कमी होत चालली आहे. लोकशाही स्वीकारून सात दश्कानंतरही मतदान जागृती कार्यक्रम घ्यावे लागतात ही मोठी शोकांतिका आहे. शासनाच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार महाविद्यालयातील नोडल अधिकारी डॉ संजय रत्नपारखे  यांनी यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ दिलीप खैरनार, डॉ अनिल अर्दड, डॉ अपर्णा तावरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य लीपाने सर, उपप्राचार्य नलावडे सर तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page