देवगिरी महाविद्यालयात मतदान जागृती मोहीम व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जागृती व मार्गदर्शन कार्यक्रम दि. १८/०३/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शन अर्चना खेतमाळीस (उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, औरंगाबाद-108) या होत्या. त्यांनी मार्गदर्शन करत असताना राज्यघटनेने प्रत्येक भारतीयांना ‘एक व्यक्ती एक मतदान’ करण्याचा अधिकार दिला आहे. तो सर्वांनी बजावला पाहिजे. भारतात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामध्ये लोकशाहीचे चित्र बदलण्याची शक्ती आहे. तेव्हा प्रत्येकाने मतदान करावे व इतरांनाही प्रवृत्त करावे. मतदार यादीमध्ये नाव नसेल तर आजही त्यामध्ये समाविष्ट करता येऊ शकते असे सांगितले.

स्वप्नील सरदार (आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर) यांनी मतदान हा संविधानिक अधिकार आणि कर्तव्य आहे. आपल्या भविष्याच्या विचार करून कसल्याही अमिषाला व भूलपाथांना बळी न पडता मतदान करावे, असे मत मांडले. अंकुश पांढरे (उपायुक्त महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर तथा अतिरिक्त नोडल अधिकारी) यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या ३०,३२,००० इतकी आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे तरी तरुणांनी स्वतः व इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे मत मांडले.

Advertisement

सुदर्शन तुपे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी औरंगाबाद) यांनी एका मताची किंमत मोठी आहे. एका मताने खूप मोठा बदल होऊ शकतो तेव्हा प्रत्येकाने जागरूकपणे मतदान करावे, असे प्रतिपादन केले. दिपाली थावरे (गट शिक्षणाधिकारी) यांनी २७ संप्टेंबर २०२१ च्या निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार शाळा व महावियालीन स्तरावर निवडणूक साक्षरता कक्ष व मानवता विभाग स्थापन करून मतदानाविषयी जागृती करावी अशा सूचना दिल्या.

अध्यक्षीय समारोप करत असताना देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर यांनी महाविद्यालयातून मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. महाविद्यालय अशा कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन करत असते. ग्राम स्तरावरील निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणत मतदान होते, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी होत जाते त्याहीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण आणखी कमी होते तर लोकसभेला यांच्या तुलनेत कमी प्रमाणात मतदान होते यामुळे बहुमताचे शासन असे यास म्हणता येणार नाही म्हणून आपल्या मताप्रमाणे शासनाची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी इतरांची वाट न पाहता आपण स्वयं प्रेरणेने मतदान करणे आवश्यक आहे. बहुमताचा विचार वास्तवात आणायचा असेल तर जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, असेही म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ सुलक्षणा जाधव यांनी तर आभार डॉ संजय रत्नपारखे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ दिलीप खैरनार, डॉ अनिल अर्दड, डॉ अपर्णा तावरे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page