एमजीएम विद्यापीठात मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम संपन्न
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक – उप जिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे
छत्रपती संभाजीनगर, दि. २१ : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश असून आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी आज येथे केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती मोहीम व मतदार नोंदणी शिबिर आज विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात संपन्न झाले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पल्लवी लिगदे, विभागप्रमुख डॉ.आर.आर.देशमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, आपण सर्व विद्यार्थी सुज्ञ असून लोकशाही म्हटली की निवडणुका आल्या आणि निवडणुका म्हटले की निवडणूक यंत्रणा आली, हे आपण जाणता. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामार्फत आपल्या देशातील आणि राज्यातील निवडणुकांचे कामकाज पाहिले जाते. यासाठी विविध स्तरावर अनेक अधिकारी काम करीत असतात. भारत निवडणूक आयोग ‘No Voter to be left behind’ हे बोधवाक्य घेऊन काम करीत आहे. या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना मतदार प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे. दिव्यांग मतदारांसह तृतीयपंथी नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.
अगोदर काही वर्षांपूर्वी आपण मतदानासाठी बॅलेट पेपर वापरत होतो मात्र, आता आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करीत आहोत. निवडणुकीच्या जनजागृतीसाठी निवडणूक आयोग वर्षभर कार्यरत असतो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आपण आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.कुलगुरू सपकाळ म्हणाले, आपले भविष्य स्वत: ठरवीत विकासामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदान करणे आवश्यक आहे. आपला मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी सामाजिक जाणीव ठेऊन मतदान प्रक्रियेत सहभागी होतील असा विश्वास मला आहे.
पल्लवी लिगदे यांनी मतदान जनजागृती मोहीम कशा पद्धतीने राबविली जाते, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच रवींद्र पाटील यांनी मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. आर. आर. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अभिषेक तुपे व आर्या सरदेशपांडे यांनी तर आभार प्रा.अजय खाके यांनी मानले.