भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञांची मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रास भेट
शेतकऱ्यांनी कृषि विषयक नवनवीन तंत्रज्ञानाविषयी नेहमीच जागरूक राहण्याची गरज – डॉ एस डी रामटेके
नाशिक : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथील जेष्ठ शास्रज्ञ डॉ एस डी रामटेके आणि डॉ पी एच निकुंभे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रास भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी कृषि विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर विविध कृषि विषयक नवनवीन प्रसार केला जातो यात पिक प्रात्यक्षिके, चाचणी प्रात्यक्षिके, शेतकरी, ग्रामीण युवक व विस्तार अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, इतर विस्तार कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमांविषयी सविस्तर आढावा या भेटीदरम्यान घेण्यात आला.
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शास्रज्ञांनी यावेळी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली. कृषि विज्ञान केंद्रामार्फत केल्या जाणाऱ्या कामाविषयी जाणून घेतानाच त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी कृषि विषयक नवनवीन तंत्रज्ञानाविषयी नेहमीच जागरूक राहण्याची गरज डॉ एस डी रामटेके यांनी बोलून दाखविली. तसेच, शेतकऱ्यांनी गटांच्या माध्यमातून शेतमालाची विक्री तसेच प्रक्रिया करावी जेणेकरून शेतमालाला चांगला चांगला भाव मिळेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत अधिकाधिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोचावे यासाठी बारकाईने लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे, त्याबद्दल डॉ रामटेके यांनी कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांचे आभार मानले.
कृषि विज्ञान केंद्राच्या विस्तीर्ण अश्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना अभ्यासता यावे यासाठी विविध कृषि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक युनिट्स उभारण्यात आले आहेत. प्रामुख्याने आधुनिक पद्धतीने १५ विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड, मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन, शेळी पालन, अत्याधुनिक फळरोपवाटिका, गांडूळखत उत्पादन, मशरूम उत्पादन, जैविक खते व जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळा, माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा, सूक्ष्म अन्नद्रव्ये उत्पादन प्रयोगशाळा, सूक्ष्म सिंचन यंत्रणा, इत्यादी प्रात्यक्षिक युनिट्सला शास्राज्ञांनी भेटी दिल्या.
कृषि विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी केंद्राची मुक्तकंठाने प्रशंसा केली व काही तांत्रिक सूचनाही केल्या. विशेषतः सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण जैविक निविष्ठा पुरवठा यासाठी कृषि विज्ञान केंद्र करीत असलेल्या कामाबद्दल त्यांनी केंद्राचे कौतुक केले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ नितीन ठोके, राजाराम पाटील, हेमराज राजूपत, डॉ प्रकाश कदम, संदीप भागवत, अर्चना मोहोड, डॉ शाम पाटील, मंगेश व्यवहारे, हर्षल काळे तसेच विविध ठिकाणाहून आलेले शेतकरी उपस्थित होते.