राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ अविनाश आवलगावकर यांची भेट
अभिजात दर्जासोबतच मराठी संवर्धनाची जबाबदारीही वाढली – मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ आवलगावकर यांची अपेक्षा
नागपूर : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मोठा आनंद आहे. या दर्जासोबतच मराठीजण म्हणून आपणा सर्वांचीच या भाषेच्या संवर्धनाप्रतीची जबाबदारी वाढली आहे, अशी अपेक्षा अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे होत असलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ अविनाश आवलगावकर यांनी शनिवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाला भेट दिली असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
डॉ आवलगावकर यांनी पुढे बोलताना मराठी भाषेची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारीही आपणा सर्वांना पेलवावी लागेल, असे आवाहन केले. अभिजात मराठी भाषेच्या सन्मानाला साजेशी अभिजात साहित्य निर्मितीवर आपल्याला भर द्यावा लागेल असे ही ते म्हणाले. यावेळी पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख डॉ शैलेंद्र लेंडे यांच्या हस्ते शाल, बुके आणि ग्रंथभेट देऊन डॉ आवलगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमलवार महाविद्यालयाच्या प्रा नीता खोत, प्रा सायली लाखे-पिदळी, प्रा सपन नेहरोत्रा, विभागातील प्राध्यापक डॉ प्रज्ञा निनावे, प्रा अमित दुर्योधन, प्रा समीर कुमरे, प्रा प्रज्ञा दुधे यांची उपस्थिती होती.