आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या श्वसनरोगतज्ज्ञाची दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाला भेट
डॉ अखिल बिंद्रा साधणार विद्यार्थी व रुग्णांशी संवाद
वर्धा : अमेरिका येथील क्लेवलँड क्लिनिकमधील सुप्रसिद्ध श्वसनरोगतज्ञ डॉ अखिल बिंद्रा दि १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाला भेट देणार असून वैद्यकीय चर्चासत्रांत विद्यार्थ्यांशी तर आरोग्य शिबिरात रुग्णांशी संवाद साधणार आहेत.
या भेटीदरम्यान डॉ बिंद्रा हे मेघे अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय येथे शुक्रवार, दि. २० रोजी आणि वानाडोंगरी, नागपूर येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार, दि. २३ रोजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी गुरूवार, दि. १९ रोजी सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात श्वसनविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून डॉ अखिल बिंद्रा रुग्णतपासणीही करणार आहेत.
याशिवाय, या भेटीत सावंगी रुग्णालय तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी या रुग्णालयांमधील श्वसनरोगाच्या रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची पाहणी करणार आहेत. मेघे अभिमत विद्यापीठाच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह अंतर्गत ही भेट होणार असून याचा विद्यापीठातील पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि श्वसनरुग्णांना निश्चितच लाभ मिळेल, असे संचालक डॉ संदीप श्रीवास्तव व श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ बाबाजी घेवडे यांनी सांगितले.