भारतीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राला भेट
अमरावती : मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयाच्या एम ए (इतिहास) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राला शैक्षणिक उपक्रमांतर्गत भेट दिली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ सतिश तराळ यांनी विद्यार्थ्यांना गाडगे बाबांचे सामाजिक कार्य, जीवन चरित्र, दशसूत्री यावर विस्तृत मार्गदर्शन केले. तर आध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे यांनी अध्यासन केंद्रांतर्गत होणा-या उपक्रमांची तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या कार्याची महती विषद केली.
या शैक्षणिक उपक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यासन केंद्रातील संत गाडगे बाबाविषयीची फोटो प्रदर्शनी तसेच गाडगे बाबांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथाची माहिती अवगत करून देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा यांची दुर्मिळ छायाचित्रे तसेच गाडगे बाबांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथ पाहता आले, त्यामुळे आध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे, डॉ संदीप राऊत, डॉ भैय्यासाहेब चिखले, प्रा अंकुश गायकवाड आदी मान्यवर प्राध्यापकांचे आभार मानलेत. प्रास्ताविक महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ संदीप राऊत, यांनी, तर आभार डॉ भैय्यासाहेब चिखले यांनी मानले.