विश्वकर्मा विद्यापीठाने हरित भविष्यासाठी वचनबद्धतेचे प्रदर्शन करण्यासाठी साजरा केले वृक्षाबंधन
पुणे : शहरातील आघाडीचे विद्यापीठ म्हणून ओळख प्राप्त असलेल्या विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरणाप्रती असणारी बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी विद्यापीठ परातीसातील झाडांना राखी बांधून ‘वृक्षाबंधन’ नावाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
रक्षाबंधन प्रेमाचा आणि करुणेचा सण आहे. हवामानातील बदलांमुळे मानवजातीसमोर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठाने हवामान बदलांना तोंड देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. वृक्षाबंधन हा निसर्गाशी एकात्मता दर्शविणारा अनोखा उपक्रम होता. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा वैभव ठाकरे म्हणाले, “या राख्या टाकाऊ वस्तू आणि जुने सजावटी साहित्य वापरून तयार केल्या होत्या. यातून विद्यापीठाचे शाश्वत वापराचे उद्दिष्ट लक्षात येते आणि ते विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. या उत्सवाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हाताने बनवलेल्या राख्या, ज्या विद्यार्थी परिषदेच्या अभिव्यक्ति विभागाने तयार केल्या होत्या.”
ते पुढे म्हणाले, “शाश्वत विकास उद्दिष्टांप्रती विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे हा यामागील उद्देश होता. या वृक्षाबंधन उत्सवाच्या माध्यमातून, आमच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वतता वाढविण्यासाठी वातावरण तयार करणे हे आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.”
विद्यापीठाच्या प्रवास आणि पर्यटन या विभागाचा पर्यावरणीय प्रतिज्ञा लिहिणारा क्लिफर्ड गुमिरेशे म्हणाला, “हवामान बदलांचे सीमा ओलांडून परिणाम होतात. संपूर्ण मानवजातीने पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. निसर्गाप्रति प्रेम आणि निसर्गाची जोपासना या भारतीय परंपरांवर विश्वास ठेवून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. हा उत्सव केवळ पर्यावरणीय शाश्वततेसाठी विद्यापीठाचे समर्पण दर्शवित नाही तर शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची आणि सक्रिय सहभागाची भावना निर्माण करण्याचे आमच्या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.”