विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि एनआरडीसी यांचा सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करण्यासाठी सामंजस्य करार

पुणे : सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ अर्थात एनआरडीसी आणि विश्‍वकर्मा विद्यापीठाने, गुरुवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महामंडळाचे संचालक शेखर मुंदडा, विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल,  कुलगुरु प्रा डॉ सिद्धार्थ जबडे उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या विकासास गती देणे आणि त्याचे व्यावसायीकरण करणे हा आहे, जेणेकरून सामाजिक-आर्थिक लाभ मिळू शकतील. दोन्ही संस्था एकत्र आणून या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

डावीकडून प्रा डॉ वासुदेव गाडे, बी बी लोहिया, डॉ मनजीत लाड, एनआरडीसी संचालक शेखर मुंदडा विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल, प्रा डॉ सिदार्थ जबडे आणि प्रा डॉ विजय खेडकर

एनआरडीसी ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत काम काम करते. या महामंडळाच्या माध्यमातून संशोधन संस्थांमधून पुढे आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा प्रसार, संवर्धन आणि व्यावसायीकरण यासाठी प्रयत्न केले जातात. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून, विश्‍वकर्मा विद्यापीठ एनआरडीसीसोबत सहकार्य करून संशोधन आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढेल आणि प्रभावी नवकल्पना पुढे आणेल.

एनआरडीसीचे संचालक शेखर मुंदडा आणि विश्‍वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अग्रवाल यांनी या करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही पक्षांनी या भागीदारीबद्दल विश्वास  व्यक्त केला आणि तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने असलेल्या या कराराच्या  क्षमतेवर भर दिला.

Advertisement

“सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने विश्‍वकर्मा विद्यापीठाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” असे एनआरडीसीचे संचालक शेखर मुंदडा म्हणाले. “विद्यापीठाने विविध क्षेत्रात ३०० हून अधिक तंत्रज्ञान विकसित केले आहे, आणि आम्ही या नवकल्पनांचे प्रसार, व्यावसायीकरण आणि प्रसारण करण्यासाठी उत्सुक आहोत. तसेच, आम्ही स्टार्टअप्सना आधार देऊन त्यांची वाढ सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करणार आहोत.”

विश्‍वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भरत अगरवाल यांनी या कराराचे महत्त्व विशद केले. “समाजातील समकालीन समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विश्‍वकर्मा विद्यापीठ  कायम कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले. “एनआरडीसीसोबतचा हा करार आमच्या विद्यापीठातील नवकल्पनांना गती देण्यास महत्त्वाची ठरेल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पांचे बौद्धिक संपदा हक्कांद्वारे संरक्षण मिळेल आणि त्यांची क्षमता जगासमोर आणण्याची संधी मिळेल.”

एनआरडीसीच्या पुणे केंद्राचे प्रभारी सहायक व्यवस्थापक मनजीत लाड यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “एनआरडीसी विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा प्रचार, हस्तांतरण आणि बौद्धिक संपदा हक्क संरक्षण यावर कार्य करते. या सामंजस्य करारामुळे, विश्‍वकर्मा विद्यापीठ हे  भारतातील  प्रतिष्ठित संशोधन संस्थांच्या यादीत सामील झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

विश्‍वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थ जबाडे यांनी सांगितले की विद्यापीठाने सामाजिक-आर्थिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यासाठी एक समावेशक आणि सहभागी दृष्टिकोन स्वीकारला आहे. “एनआरडीसीसोबतचे सहकार्य या मॉडेलला अधिक बळकट करेल आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याच्या आमच्या क्षमतेत वृद्धी करेल,” असे त्यांनी नमूद केले.

या सामंजस्य करारामुळे विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि एनआरडीसीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी एक नवा अध्याय सुरू केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह समाजालाही मोठा लाभ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page