कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते ‘गोष्टीतून विज्ञान सुगंध’ पुस्तकाचे प्रकाशन
गोष्टींतून समजेल, विज्ञान म्हणजे काय ?
नागपूर : विज्ञान म्हणजे काय?, हे अत्यंत सोप्या भाषेत आणि रंजक कथांमधून सांगणारे पुस्तक नागपूर येथील लेखकांनी लिहिले आहे. ‘गोष्टींतून विज्ञान सुगंध’ या सोप्या भाषेत विज्ञान उलगडून सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात झालेल्या कार्यक्रमाला प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, पुस्तकाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय जानराव ढोबळे व नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मानसी मंगेश कोलते यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओळख निर्माण होण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या या पुस्तकाचा फायदा आजच्या पिढीला नक्कीच होईल असा विश्वास माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी व्यक्त केला. लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून होणार आहे. शिवाय नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण २०२० मध्ये देखील मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचा देखील नक्कीच उपयोग होईल असे कुलगुरू म्हणाले. पुस्तकाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त करीत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी पुस्तक जरूर वाचावे, असे आवाहन केले. नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. मानसी मंगेश कोलते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी ‘गोष्टीतून विज्ञान सुगंध’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर यांनी देखील लेखकांना शुभेच्छा दिल्या. ‘गोष्टीतून विज्ञान सुगंध’ या पुस्तकात वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित २१ रंजक कथा असून पुण्याच्या निराली प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.