कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील प्रोफेसर पदावरून सेवानिवृत्त
राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप सत्रात प्रा माहेश्वरी यांच्या सेवेचा गौरव
जळगाव : खान्देशात जैवशास्त्र विषयातील पहिली पिढी घडविण्याचे काम शिक्षक या नात्याने प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी केले असून आज एकीकडे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवाद संपत असतांना प्रा माहेश्वरी यांच्यासारखा शिक्षक होणे नाही अशी भावना प्रा माहेश्वरी यांच्या गौरव समारंभात व्यक्त झाली.
कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी हे ३१ वर्षांच्या सेवेनंतर दि ३१ जुलै रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील प्रोफेसर पदावरून सेवानिवृत्त झाले. जैवशास्त्र प्रशाळेच्या वतीने दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप सत्रात प्रा माहेश्वरी यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष तथा परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सी डी मायी उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रशाळेचे संचालक प्रा ए जी इंगळे, संयोजन सचिव प्रा भूषण चौधरी व प्रा के एस विश्वकर्मा, शैलैजा माहेश्वरी उपस्थित होते.
यावेळी आघरकर संशोधन केंद्र पुणे येथील डॉ प्रशांत ढाकेफळकर, डॉ तुषार बोरसे, नॅशनल केमिकल लॅब पुणे येथे डॉ अशोक गिरी, जळगाव येथील नवीन दंदी, उद्योजक डॉ निलेश तेली, पुणे येथील डॉ हेमलता मेंडकी या आजीमाजी विद्यार्थ्यांनी प्रा माहेश्वरी यांच्याबद्दल हृदय भावना व्यक्त केल्या. प्रा माहेश्वरी यांनी कायम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांच्या सुख दु:खात ते सहभागी झालेत. उद्योजकतेचे मार्ग त्यांनी दाखविले. संशोधनात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे समर्पणाच्या भावनेतून ते शिक्षक म्हणून कायम कार्यरत राहिले अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
डॉ सी डी मायी यांनी शिक्षक हा निवृत्त होत नसतो. कुलगुरू या नात्याने प्रा माहेश्वरी हे यापुढेही विद्यार्थ्यांना मार्ग दाखवतील असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा एस टी इंगळे यांनी प्रा माहेश्वरी हे उत्तम शिक्षक आहेत. त्यांनी संशोधक विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. चर्चा आणि संवादातून ते सतत मार्ग काढत असतात असे प्रा इंगळे म्हणाले. सत्काराला उत्तर देतांना प्रा माहेश्वरी यांनी आपल्या ३१ वर्षातील शिक्षक म्हणून आलेले अनुभव आणि जीवन प्रवास सांगितला. शिक्षकीपेशाचा आपण आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये रमायला आपल्याला आवडते. संशोधन हा आपला आत्मा आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भूषण चौधरी यांनी या परिसंवादाचा अहवाल सादर केला. प्रा प्रवीण पुराणीक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा के एस विश्वकर्मा यांनी आभार मानले.
या परिसंवादाच्या सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगर येथील डॉ सतीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील डॉ मुनीष कुमार, इंदौर येथील प्रा मिता जैन यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर तुमसर येथील डॉ के एन साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात डॉ प्रशांत ढाकेफळकर, इंदौर येथील डॉ सुनीता कटारीया यांचे व्याख्यान झाले.