शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धेत सहभागी व्हावे मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांचे आवाहन

नाशिक : पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धेत (एनएसपीसी – २०२५) राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी विद्यापीठ प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या माध्यमातून दिनांक ०१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणा च्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या आव्हानांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Vice Chancellor Prof. Sanjeev Sonawane

कुलगुरू प्रा सोनवणे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी या पर्यावरण स्पर्धेचे सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी. स्वत:च्या घराला जास्तीत जास्त पर्यावरण पूरक हरित घर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यात प्रामुख्याने पाणी जपून वापरणे: विशेषत: एकच बादली पाण्यात स्रान करणे, आलेल्या पाहुण्यांना हवे तेवढेच पाणी घेता यावे म्हणून तांब्या व रिकामा छोटा पेला द्यावा, आरओचे वाया जाणारे पाणी आणि एसी चे जमा होणारे पाणी वाचवावे, ते झाडांना वा इतरत्र वापरावे, पाण्याची गळती थांबविणे आदी उपायांचा समवेश आहे. तसेच आवश्यक नसलेली विद्युत उपकरणे बंद करणे, एलईडी लाइट्सचा उपयोग करून विजेची बचत करता येईल.

उर्जेसाठी सौर उर्जा व बायोगॅस या नैसर्गिक उर्जा स्त्रोतांचा उपयोग करता येईल. कमीत कमी कचरा निर्माण होईल अशी जीवनशैली अंगीकारतांना कचऱ्याची वर्गवारी व त्याची विल्हेवाट तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे ओला कचरा, सुका कचरा, ई – कचरा व सॅनिटरी कचरा स्वतंत्र ठेवला पाहिजे. स्वयंपाक घरातील उष्टे – खरखटे पासून खत केले पाहिजे. पर्यावरणात झाडांचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या परीने घराची गच्ची, छत, अंगण येथे बाग – बगीचा, परसबाग, धन्वंतरी वाटिका, पंचवटी फुलवली – वाढवली पाहिजे. पशुपक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करणे पर्यावरण संरक्षण गतिविधीचाच भाग आहे.

हल्लीच्या काळात पॉलीथिनचा वापर ही मोठी समस्या बनली आहे. पॉलीथिन मुळे पशू पक्षी जनावरे मरतात, नाले तुंबुन शहरी पूर येतात, जमीन विषारी होते, कॅन्सर सारखे दुर्धर रोग होतात. पॉलीथिन हे विष आहे. त्यामुळे पॉलीथन मुक्त परिसर बनवूया. त्यापासून सृष्टीचे रक्षण करूया. कापडी पिशवी वापरण्यास सुरुवात करुया.

राष्ट्रीय विद्यार्थी पर्यावरण स्पर्धा ही एक ऑनलाइन पर्यावरण जागरूकता स्पर्धा व मोहीम आहे. जी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे आणि यामध्ये सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी ८४२१९९११४४, ९८५०८८३८९० किंवा ९९६०६६३८०२ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात किंवा दिलेल्या क्यूआर कोडचा उपयोग करू शकतात. त्यामुळे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com