‘स्वारातीम’ विद्यापीठात पोलीस भरती सरावासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी केले मार्गदर्शन
विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये उत्कृष्ट असे खेळाचे मैदान आहे. या मैदानावर जिल्हास्तरीय पासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचे सर्व खेळ खेळले जातात. मैदान रिकामे असते तेव्हा पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मैदानाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपले ध्येय गाठावे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि १३ जुलै रोजी विद्यापीठातील मैदानावर सकाळी ८:०० वा नांदेड शहरातून पोलीस भरती सरावासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. स. ६:०० वाजल्यापासून जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी पोलीस भरतीच्या सरावासाठी विद्यापीठाच्या मैदानावर येत आहेत. त्यांना प्रेरणा देण्यासाठी कुलगुरूंनी त्यांना मार्गदर्शन केले.
पुढे कुलगुरू म्हणाले की, विद्यापीठाचे सामाजिक दायित्व म्हणून मी आपणास मार्गदर्शन करीत आहे. आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांची पोलीस भरतीमध्ये निवड होणार नाही त्यांनी नाउमेद न होता दुसराही पर्याय ठेवला पाहिजे. लवकरच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मोठ्या शहरातील जवळपास ७० ते ८० उद्योगाचे व्यवस्थापक नौकर भरतीसाठी येणार आहेत. त्यावेळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यामध्ये नोकरी मिळू शकते. त्यासाठी आपला बायोडाटा विद्यापीठामध्ये जमा करावा.
विद्यापीठातर्फे ही रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित अशा अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात येत आहे. असे कोर्सेस केल्यामुळे लवकरच आपणास स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. त्यामुळे एखादी संधी हुकली तरी नाउमेद न होता दुसऱ्या आवाहनासाठी तयार राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी क्रीडा विभागातील कर्मचारी शिवाजी हंबर्डे, सुनिल लुटे, रतनसिंघ पुजारी उपस्थित होते.